BMC Election : आगामी काळात राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. राज्यात सर्व महापालिकाप्रमाणे विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक पक्ष आपल्या परीने या निवडणुकीची रणनीती आखत कामाला लागला आहे. त्यात शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. रविवारी त्यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला हजेरी लावली आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून आता हिंदी भाषिक व्होट बँक मजबुतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत, अशी चर्चा त्यामुळे रंगू लागली आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. मुंबईत सर्वच भाषिक मतदार असल्याने, त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यात शिवसनेने आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबईचा योग्य अभ्यास करून प्रांत, भाषा, संस्कृती, मुंबईकरांचे प्रश्न या आदी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कळते. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांच्या एका मेळाव्यात गेले होते. त्यामुळे हिंदी भाषिक मतदारांना वळवण्यासाठी विविध प्रयत्नाने सेनेला फायदा होण्याची शक्यता आहे.
मुंबईत वेगवेगळया भाषा बोलल्या जात असल्यातरी मराठी भाषा ही मुंबईची मुख्य ओळख आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवरून ठाकरे यांनी महाराष्ट्रात नव्हेत तर देशांत आपली वेगळी ओळख तयार केली. राम मंदिराच्या मुद्द्यांवरून भाजप सरकारला घेरलं तारीख नही बतांएंगे पर मंदिर वही बनाएंगाचा नारा मोदींच्या विरोधात दिला होता. राम मंदिरचा मुद्दा हिंदूंच्या आस्थेचा विषय बनला होता उत्तर भारतातील लोकांनी देखील उद्धव ठाकरेंना डोक्यावर घेतलं होतं पण हा मुद्दा देखील हळुहळु मार्गी लागला आणि मोदींनीच मंदिराचे भुमिपुजन करत मुद्दा हाजजॅक केला. कोराना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उत्तर भारतीयांना स्थलांतराच्या काळात मदतीचा हात दिला होता. उत्तर भारतीय कामगारांनी कोरोना काळात उद्धव ठाकरेंचे आभारही मानले होते, असे विविध मुद्दे उद्धव ठाकरे आणि उत्तर भारतीयांशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे उत्तर भारतीय नेमकं काय करतात, हे आत्ताच सांगणं कठीण आहे.
मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या वाढली
मातृभाषे संदर्भातला 2011 सालचा जनगणनेचा जो अहवाल आहे. त्यानुसार मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे. 2001 साली मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 25.88 लाख होती. 2011 मध्ये हेच प्रमाण 35.98 लाख झाले. त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत 2.64 टक्के घट झाली. 2001 साली 45.23 लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. मात्र 2011 मध्ये हेच प्रमाण 44.04 लाख झाले. 2011 जनगणनेनुसार मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या वाढली असल्याचं स्पष्ट आहे. त्यात गेल्या 11 वर्षात ही बराच बदल झाल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हिंदी भाषिक मतदारांना वळवण्यासाठी सर्वच पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत, हे स्पष्ट आहे. हिंदी भाषिकांची वाढती संख्या, वाढते हिंदी भाषिक नगरसेवक, यातच राजकीय पक्षांच्या वादात होत असलेले मतांचे विभाजन हे आपल्याच पथ्यावर कसे पडेल, याचीच चाचपणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षामार्फत आता मेळाव्या निमित्त केली गेली, असे म्हटले तरी राजकीय दृष्ट्या वावगे ठरणार नाही..
आणखी वाचा :
BMC Elections : मुंबई जिंकण्यासाठी भाजपचं 150 मिशन काय आहे? वाचा सविस्तर