BMC Elections : पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी शिवसेना, भाजपसह इतर पक्षांनी तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षानं आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई भाजपाची कार्यकारणी बैठक पार पडली. आज पार पडलेल्या बैठकीला भाजपचे मुंबईतील खासदार,आमदार, नगरसेवक आणि मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई जिंकण्यासाठी भाजपानं मिशन 150 ठरवलं आहे. पण हे मिशन 150 नमकं आहे तरी काय? मिशन 150 ची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आगामी मुंबई महापालिका दृष्टीने पक्ष संघटन आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी मिशन 150 ही भाजपची दादर कार्यालयांत महत्वपूर्ण बैठक होती. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेश भाजपा कार्यकारणी बैठक झाली. या बैठकीत विनोद तावडे ( राष्ट्रीय सरचिटणीस, भाजपा), चंद्रशेखर बावनकुळे ( प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र भाजपा) , पूनम महाजन, आशिष शेलार, यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि सूचना दिल्या. भाजपच्या मिशन 150 ला आजपासून सुरुवात झाल्याचं बोललं जातेय.
मुंबई भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आज नेमकं काय घडलं ?
- मुंबई पालिकेत 150 नगरसेवक निवडून येतील, या दृष्टीने नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले
- शिवसेनेच्या कार्याकाळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा राजकीय ठराव मांडण्यात आला. त्यानुसार प्रत्येक विभागात जाऊन हे मांडले जाईल.
- प्रत्येक वॉर्डमध्ये विरोधकांची स्थानिक पातळीवरील चुकीची कामे लोकांच्या निदर्शनास आणा..
- ज्या विभागात भाजपची मोठया प्रमाणात ताकद नाही, त्याठिकाणी पक्ष संघटन आणखी मजबूत आणि विविध कार्यक्रम राबवण्यासाठी निर्णय झाले.
- राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करण्याचा सूचना देण्यात आल्या.
- मुंबईतील मूलभूत सोयीसुविधा लोकांना मिळाल्यात का हे पहा आणि त्या आपल्या मार्फत पोहचवा.
- माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भर देण्याविषयी मार्गदर्शन झाले.
- जिथे भाजपचा नगरसेवक तिथे भाजप उमेदवार दिला जाईल , जिथे सेनेचा तिथे शिंदे गट किंवा आपला चांगला उमेदवार देऊ.. इतर पक्षाचे नगरसेवक आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपला जोर लावा, त्या जागा आपण लढवू असे सांगण्यात आले.
- आगामी निवडणुकीत भाजपने जे लक्ष्य निश्चित केले आहे ते कसे साध्य केले जाईल याचे समीकरण विनोद तावडे , चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी मांडले.