भिवंडी : भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पिराणी पाडा परिसरात असलेल्या यहीया कंपाऊंड येथे भिवंडी फाईट क्लबचे आयोजन करण्यात आले होते. या फाईटला थाई बॉक्सिंग या नावाने ओळखले जाते. यामध्ये दोन फायटर एका रिंगमध्ये प्रवेश करून फाईट करतात. या फाईटला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कोरोना काळ सुरु असताना देखील याठिकाणी कोरोनाच्या कोणत्याही नियमांचं पालन कोणीही करतांना दिसलं नाही. विशेष म्हणजे याठिकाणी आलेल्या कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता.एकंदरीत या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. याप्रसंगी फाईट क्लबचे आयोजक सलमान अब्दुल कयुम याच्या विरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उद्घाटनाच्या वेळी भाजपा आमदार महेश चौगुले उपस्थित
दरम्यान या फाईट क्लब चे उद्घाटन काल सायंकाळी करण्यात आलंं. या उद्घाटनाच्या वेळेस भाजपा आमदार महेश चौगुले हे उपस्थित होते. तसेच या क्लबमध्ये त्यांच्या मुलाने देखील भाग घेतला होता व त्यांनी विजय देखील मिळवला. ही फाईट होत असताना डोक्यावर सेफ्टी हेल्मेट नव्हतं तसेच कोणत्याही प्रकारची सेफ्टी घेण्यात आली नव्हती. कोणतेही नियम पाळले जात नव्हते हे स्पष्ट दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोरोना काळ सुरू असताना देखील या ठिकाणी कुणाच्याच चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजले होते.
या फाईट क्लब चे आयोजन करणारे सलमान अब्दुल कयुम यांनी या फाईटचे प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून करत होते. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होण्यास सुरुवात झाले. त्यानंतर ही बातमी पोलिसांना मिळाली. यानंतर तात्काळ पोलिसांनी फाईट क्लब च्या ठिकाणी पोहोचून फाईट थांबवली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फाइट क्लबचे आयोजक सलमान अब्दुल कयुम यांच्या विरोधात कलम 188,37,(1)(3),135 गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.