मुंबई : परराज्यातील कामगार, मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी स्पेशल ट्रेनची सोय करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवर एबीपी माझाशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांच्या सल्लाचा आम्ही सन्मान करतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य ठरेल.


मुंबईतून या परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी ट्रेन सोडली, तर कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठीची शिस्त पाळली जाईल का? याची तुम्ही गॅरंटी घ्याल का? स्टेशनवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवासी प्रवास करतील, हे शक्य आहे का? असा सवाल नितीन गडकरी यांनी विचारला. वांद्रे स्टेशन बाहेर काय झालं हे सर्वांनी पाहिलं. अशी ट्रेन सोडली आणि ट्रेनमध्ये गर्दी झाली, त्यानंतर दिल्लीच्या निजामुद्दीन कार्यक्रमातून कोरोनाचा प्रसार झाला, तसं काही घडलं तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे अशी स्पेशल ट्रेन सोडणे सध्यातरी अशक्य आहे. सध्याच्या स्थितीत असं करणे गंभीर आहे. त्यामुळे असा काही निर्णय घेणे अयोग्य ठरेल. पुढच्या काळात नक्की खबरदारी घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.


परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी



परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहे, ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करता येईल का? याचा विचार केंद्र शासनाने करावा, एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.


उद्योगधंदे सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील


ज्या भागांमध्ये स्थिती नियंत्रणात आहे, तिथे उद्योग लवकरात लवकर सुरु करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. उद्योगधंदे बंद ठेऊन चालणार नाही. अनेकांचे रोजगार यावर अवलंबून आहेत. उद्योगधंदे सुरु करताना सोशल डिस्टन्सिंग पाळली जाणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठीच्या उपाययोजना राबवणे याची जबाबदारी कंपनी मालकांनी घ्यायला हवी. त्यासाठी मास्क वापरणं, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, कामगारांच्या निवाऱ्याची आणि अन्नाची व्यवस्था करणे याची अमलबजावणी मालकांनी करायला हवी, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.


संबंधित बातम्या







Corona Ground Report | कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट! काय म्हणतोय गावाकडचा कोरोना?