नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षेचं आश्वासन दिल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (बुधवार) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत अमित शहा यांनी डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे.
अमित शाहांनी केलं सर्व डॉक्टरांचं कौतुक
इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत पार पडलेल्या बैठकीत अमित शहा यांनी सर्व डॉक्टरांचं कौतुक केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व डॉक्टर्स आपल्या प्राणांची पर्वा न करता कोरोना विरोधात लढा देत आहेत. यादरम्यान अमित शाह यांनी डॉक्टरांना आपलं आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच अमित शाह यांनी आयएमएला आश्वासन दिलं असून सरकार तुमच्यासोबत आहे. तुम्हा सर्वांना सुरक्षा पुरवणं सरकारची प्राथमिकता आहे, असं म्हणाले आहेत.
दरम्यान, डॉक्टरांवरचे हल्ले थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश काढावा नाहीतर 23 एप्रिलला काळा दिवस पाळण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला होता. हा काळा दिवस पाळण्याच्या एक दिवस आधी सरकारला व्हाईट अलर्ट देण्याचंही नियोजन इंडियन मेडिकल असोसिएशनने केलं होतं. बुधवारी म्हणजेच 22 एप्रिलला रात्री 9 वाजता सर्व डॉक्टरांनी आपले पांढरे कोट परिधान करत मेणबत्ती पेटवून शांततेत या हल्ल्यांचा निषेध करावा असं आवाहन करण्यात आलं होतं.
Attack on Doctors | आयएमएचे डॉक्टर 23 एप्रिलला काळा दिवस पाळणार!
डॉक्टर्स का करणार होते आंदोलन?
डॉक्टरांवरचे हल्ले हा खरं तर जुनाच विषय. पण कोरोनाच्या या गंभीर संकटातही हे प्रकार थांबलेले नाहीत. कुठे यांना सोसायटीत प्रवेश दिला जात नाही, कुठे अपमानास्पद वागणूक मिळत आहे, तर कुठे मारहाणही करण्यात येत आहे. समाजासाठी जीव धोक्यात घालून काम करावं तर ही अवस्था. तर चेन्नईमध्ये कोरोनामुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीलाही लोकांनी विरोध केला. अॅम्ब्युलन्सवर दगडफेक केली. मृत्यूमध्येही आम्हाला सन्मान नाकारला जातोय, अशा कडक शब्दांत नाराजी व्यक्त डॉक्टरांनी या पत्रात सरकार निर्वाणीचा इशारा दिला होता. तसेच, अगदी पंधरा दिवसांपूर्वींच इंदूरमध्ये कोरोनाची टेस्ट करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना असा हल्ला सहन करावा लागला. मुंबईतल्या नर्सेसनी सोसायटीत नीट वागणूक देत नसल्याची तकार केली होती. चेन्नईप्रमाणेच आंध्र प्रदेशातही काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केला, निदर्शनं झाली.
डॉक्टरांची काय होती मागणी?
डॉक्टरांवरचे हल्ले थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश काढावा नाहीतर 23 एप्रिलला काळा दिवस पाळण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला होता. ज्यामध्ये देशातील सर्व डॉक्टर्स हातावर काळी पट्टी बांधून काम करणार होते. मागील वर्षी मेडिकल हेल्थ केअर आणि डॉक्टर्ससोबत झालेल्या मारहाणीविरोधात कायदा करण्यासाठी याआधीही डॉक्टरांनी आंदोलनं केली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं मुकेश अंबानींच्या साम्राज्याला मोठा फटका!
Coronavirus | कच्च्या तेलाच्या किमतीत ऐतिहासिक घसरण; भारताला 'हे' फायदे होऊ शकतात
Coronavirus | राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; 100 कुटुंब सेल्फ क्वॉरन्टाईन