मुंबई : एबीपी माझाने आज (12 मे 2021) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड आरक्षित बेडची अनधिकृतपणे विक्री होत असण्याविषयीची बातमी प्रसारित केली होती. या बातमीची अत्यंत गंभीर दखल महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या रुग्णालयांमधील बेड वितरणाबाबत अत्यंत काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. आता दररोज सकाळी बेड विषयक आढावा घेण्याचेही निर्देश आयुक्त महोदयांनी दिले आहेत. त्याचबरोबर अशाप्रकारे बेडची विक्री करणाऱ्या विरोधात पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत व त्यांचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने नियंत्रण कक्षांद्वारे केले जात आहे. या विषयीची सर्व माहिती संबंधित संगणकीय प्रणालीच्या डॅशबोर्ड वर उपलब्ध असून ही नियमितपणे अद्ययावत होत असते. तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच बेडची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना वा महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन आयुक्तांनी केलं.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सध्या एकूण 22 हजार 564 बेड असून यापैकी 10 हजार 829 बेड सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड इत्यादी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ह्या कोविड बाधित रुग्णांसाठी राखीव आहेत.
कोविड बाधित रुग्णांसाठी उपलब्ध बेडचे वितरण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागस्तरीय वॉर्ड वॉर रूमद्वारे करण्यात येते. तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार ज्यांना रुग्णालयांमध्ये रुग्णशय्येची आवश्यकता आहे, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा व नियंत्रण कक्षाद्वारेच बेड वितरण करवून घ्यावे, ही विनंती. महापालिकेच्या सर्व विभागस्तरीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक हे महापालिकेच्या संकेतस्थळावर व ट्विटर सारख्या समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.