संजय राऊत यांनी डाॅक्टरांबाबत व्यक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी आणि आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन तसंच मार्ड या संघटनांनी केली होती. त्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी राऊत म्हणाले की, काही विशिष्ट पक्षाची लोकं डॉक्टरांना हाताशी घेऊन मोहीम करत आहेत. WHO ही एक राजकीय संघटना तयार झाली आहे ट्रम्प आणि रशियानंही विरोध केला आहे. मी दिलगिरी व्यक्त करून, ट्र्म्प आणि पुतिन यांनी WHO बद्दल केलेले वक्तव्य पुसून जाणार आहेत का? मी WHO बद्दल बोललो होतो त्याचा आणि आपल्या डाॅक्टरांचा काय संबंध आहे? असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील डॉक्टर संपावर गेलेते का ? पुतीन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला न विचारता लस बाजारात आणली म्हणून तेथील डॉक्टर आंदोलन करत आहेत का ?असा सवाल राऊत यांनी केला.
'डॉक्टरांना काय कळतं' या संजय राऊतांच्या वक्तव्याचा विरोध, मार्डचा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इशारा
संजय राऊत म्हणाले की, डाॅक्टर मंडळी आमचीच आहे. डाॅक्टरांच्या मदतीला मी स्वत: गेलो होतो. डाॅक्टर अव्वाच्या सव्वा बील देत होते त्यांच्या विरोधात आंदोलनं होत होती. तेव्हा मी डाॅक्टरांच्या मदतीला धावलो आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांन रुग्णसेवेत रस नसून औषधं विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी हे वक्तव्य आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, इथल्या नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही, असं राऊत म्हणाले. जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती, असं देखील ते म्हणाले.
डॉक्टरांच्या संघटनांची नाराजी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या डॉक्टर्ससंबंधात केलेल्या वक्तव्यानंतर मार्ड संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावर मार्ड संघटनेनं 'आपली सुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे असे ग्राह्य धरावे का?' असा प्रश्न पत्रातून मुख्यमंत्र्यांना केला आहे. मार्डने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, एकीकडे मुख्यमंत्री डॉक्टर्स कोरोना योद्धा आहेत, असं म्हणतात तर त्यांचेच सहकारी संजय राऊत अशी वल्गना करत आहेत. डॉक्टरांना काय कळते ? हे ऐकवून दाखवत असताना याचा अर्थ काय घ्यायचा ? असा प्रश्न विचारला आहे. तर संजय राऊत यांनी डाॅक्टरांबाबत व्यक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. याबाबत त्यांनी आयएमएच्या राज्यस्तरीय कार्यकारणीमध्ये ठराव मंजूर केला आहे.
काय म्हणाले होते राऊत
एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेडिकल, औषध यांचा अनुभव दांडगा आहे. आरोग्यव्यवस्था, यंत्रणा याचा अभ्यास आहे. कारण त्यांनी मुंबई महानगरपालिका अनेक वर्ष सांभाळलीय. मुंबईत अनेक आजार सतत येत असतात. WHO ला काय कळतं? ते सीबीआयसारखं आहे. जागतिक आरोग्य संघटना काय आहे, इकडून तिकडून गोळा केलेली माणसं आहेत, असं राऊत म्हणाले. त्यात सगळे डॉक्टर आहेत असं म्हटल्यानंतर राऊत म्हणाले की, डॉक्टर असले म्हणून काय झालं, मी कधी डॉक्टरांकडून औषधं घेत नाही, मी कंपाऊंडरकडून औषधं घेतो. तुम्ही काय WHOचं घेऊन बसलात. त्यांच्या नादी लागलो म्हणून कोरोना एवढा वाढला आहे, असं राऊत म्हणाले होते.