मुंबई : कर्जात बुडालेले रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. वैयक्तिक हमीच्या एका प्रकरणात लंडनच्या एका कोर्टाने अनिल अंबानी यांना तीन चिनी बँकांचे 717 मिलियन डॉलर (जवळपास 5000 कोटी रुपये ) 21 दिवसांच्या फेडण्याचे आदेश दिले आहेत.


आरकॉमच्या कॉर्पोरेट लोनशी संबंधित प्रकरण
हायकोर्ट ऑफ इंग्लंड अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाचे न्यायमूर्ती नीगेल टीयरे म्हणाले की, "या प्रकरणात अनिल अंबानी यांनी वैयक्तिकरित्या हमी दिली आहे. त्यामुळे त्यांना ही रक्कम फेडावीच लागेल. तर दुसरीकडे "हे प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) 2012 मध्ये घेतलेल्या कॉर्पोरेट लोनशी संबंधित आहे. पण या कर्जासाठी अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली नव्हती," असा दावा अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी केला आहे.


या बँकांना पैसे द्यायचे आहेत!
इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, (आयसीबीसी) मुंबई शाखा
चायना डेव्हलपमेंट बैंक
एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना


फेब्रुवारीत 100 मिलियन डॉलर जमा करण्याचा आदेश
लंडनच्या कोर्टाने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अनिल अंबानी यांना 100 मिलियन डॉलर एवढी रक्कम सहा आठवड्यात देण्याचा आदेश दिला होता. तेव्हा अनिल अंबानी यांनी कोर्टात सांगितलं होतं की, "सध्या माझं नेटवर्थ शून्य झालं आहे आणि कुटुंब मदत करत नाही. त्यामुळे मी 100 मिलियन डॉलर फेडण्यास सक्षम नाही."


दिवाळखोरीत आरकॉम
आरकॉमवर सुमारे 46 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. लंडन कोर्टाच्याआदेशानुसार, वैयक्तिक हमीच्या अंतिम रकमेचं आकलन आरकॉमच्या रिझॉल्यूशन प्लानच्या आधारावर होईल, असं अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. "एकदा रिझॉल्यूशनची प्रक्रिया पूर्ण झाली की आदेशात सांगितलेली रक्कम फेडली जाईल. आरकॉमच्या कर्जदात्यांनी मंजूर केलेल्या रिझॉल्यूशन प्लॅननुसार ही कथित वैयक्तिक हमीची रक्कम सुमारे 50 टक्के कमी होईल," असंही प्रवक्ते म्हणाले.


दरम्यान आम्ही लंडनमधल्या कोर्टाच्या निर्णयाबाबत कायदेशीर पर्यायांवर विचार करत असल्याचंही प्रवक्त्यांनी सांगितलं