मुंबई : शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला खरा, मात्र फक्त भाषण करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घरी परतले. त्यानंतर विमा कंपनीला शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. राज्यातील खासगी विमा कंपन्यांना 15 दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांविरोधात धडक मोर्चा काढला. वांद्र्यातील बीकेसी मैदानावर सकाळी साडेअकरा हा मोर्चा धडकला. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, विश्वनाथ महाडेश्वर, रामदास कदम अशा आमदार-खासदारांसह शिवसैनिक उपस्थित होते.

या मोर्चात स्वतः उद्धव ठाकरे सहभागी झाल्यामुळे त्यांची हजेरी शेवटपर्यंत असेल आणि विमा कंपनीला त्यांच्या उपस्थितीत इशारा दिला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र भाषण आटोपताच उद्धव ठाकरे गाडीने आपल्या 'मातोश्री' या निवासस्थानी परतले.



वांद्रे-कुर्ला संकुल येथील 'भारती अॅक्सा ' या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेने मोर्चा काढला. यावेळी 'शिवसेना जिंदाबाद', 'आवाज कुणाचा.... शिवसेनेचा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटपासून या मोर्चाला सुरुवात झाली. विमा कंपनीच्या मुख्यालयासमोर उद्धव ठाकरेंनी भाषण केलं.

आम्ही ज्यांचं अन्न खातो, त्यांना जागतो. मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण बांधील आहोत, असं सांगतानाच शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. मोठमोठे लोक चुना लावून देश सोडून गेले, माझा शेतकरी देह सोडून जातो, अशी खंतही यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

राज्यातील खासगी विमा कंपन्यांना 15 दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला आहे. बँक खात्यातून शेतकऱ्यांची फसवणूक न करण्याचीही सूचना यावेळी त्यांनी केली.