मुंबई : पुण्यातील गणेशोत्सवामधून लोकमान्य टिळकांना हटवणं म्हणजे कोडगेपणा आणि निर्लज्जपणा आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. 'मार्मिक' या मासिकाच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.


सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली, यावरुन पुण्यात भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळक समर्थकांमध्ये वाद सुरु आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोवर टिळक आणि रंगारी यापैकी कोणाचाही फोटो न लावण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोत टिळकांचा फोटो नाही

त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "पुण्यात होणाऱ्या गणपती उत्सवातून लोकमान्य टिळकांचा चेहराच त्यांनी हटवला आहे. एवढा कोडगेपणा आणि निर्लज्जपणा आपल्यात आला आहे. गणपती उत्सवाच्या माध्यमातून ज्यांनी एका सणाची चळवळ केली, त्या लोकमान्य टिळकांनीची आठवण आपण विसरायला लागलो तर पुढे काळोखाशिवाय काही राहणार नाही. कपाळ करंटे म्हणून आपली इतिहासात नोंद होईल."

दरम्यान, 'वंदे मातरम'चा विरोध करणाऱ्या नेत्यांचाही उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. "26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट जवळ आला की आपल्या सगळ्यांना देशप्रेमाचं भरतं येतं. मग आपल्याला राष्ट्रगीत आठवतं, वंदे मातरम आठवतं. महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम आठवड्यातून दोनदा की तीनदा करण्यापेक्षा रोज करा. रोज वंदे मातरम बोललंच पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले

काय आहे वाद?
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पुणे महापालिकेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने अनेक कार्यक्रम पत्रिका छापण्यात आल्या आहेत, फ्लेक्स तयार केले आहेत. मात्र त्यावर लोकमान्य टिळकांच्या फोटोऐवजी गणपतीचा फोटो असेल, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाला वादाची पार्श्वभूमी आहे.

मानाच्या पाच गणपतींपैकी एक असलेल्या भाऊ रंगारी गणपती मंडळाचा दावा आहे की, “लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात करण्याच्या दोन वर्ष आधी भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यामुळे यंदा शतकोत्तर रौप्य वर्ष नाही तर त्याआधीच गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या संदर्भातील पुरावे आम्ही सातत्याने सादर केले आहेत.

यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे पत्रिका आणि फ्लेक्सवर लोकमान्य टिळक किंवा भाऊ रंगारी यांच्या फोटोऐवजी फक्त गणपतीचा फोटो लावायचा, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पाहा व्हिडीओ