मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंत्रिमंडळ विस्तारावर काल रात्री चर्चा झाली. शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत ही माहिती मिळाली आहे.


मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा आहे. पण यावरुन नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केली आहे. तसेच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं आहे.


यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्याने आणखी एखादं मंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यमंत्री पदासाठी राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत, उदय सामंत यांची नावं आघाडीवर आहेत. तर दादाजी भुसे आणि संजय राठोड यांचीही नावं चर्चेत आहेत.



एकीकडे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत होते, तर दुसरीकडे भाजपाच्या मंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये रात्री दोन वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत आणि त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.


काल या सगळ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांकडून रावसाहेब दानवे यांना अचानक बोलावणं आलं. त्यामुळे ते एका स्पेशल विमानाने मुंबईत दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला त्यांचा कोटा देण्यात येईल म्हणजेच त्यांचं रिक्त झालेले एक कॅबिनेट मंत्रीपद आणि दुसरं एक राज्यमंत्रिपद किंवा कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.