मुंबई : लॉकडाऊन 4.0 आजपासून लागू झालं आहे. मात्र चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रेड झोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व्यवसायांना मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीला 70 हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. 5 लाख कामगार काम करत आहेत. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नव्याने भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. याचाच एक भाग म्हणून 40 हजार एकर जमीन उद्योगासाठी राखून ठेवण्यात आली आहे. त्याचा लाभ घेऊन परदेशी उद्योजकांनी पुढे यावे, हरित उद्योग सुरु करावेत, त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, कोणत्याही अटी आणि शर्थीशिवाय राज्यात उद्योग सुरु करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक उद्योजकांना साद घालतांना महाराष्ट्र उभा करण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांनी पुढे यावे आणि उद्योग संधींचा लाभ घ्यावा, असं आवाहन केलं.


भाडेतत्वावर जमीन


आपल्यासमोर दोन आव्हाने असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला आपले ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत तिथे एकही रुग्ण निर्माण होऊ द्यायचा नाही. तर रेड झोनचे ग्रीन झोनमध्ये रुपांतर करणे हे देखील आव्हान आहे. ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरु करताना जमीन घेण्यासाठी पैसे नसतील तर भाडेतत्वावर जमीन उपलब्ध करून देतांना सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांची ही उपलब्धता करून दिली जाईल.


लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरस प्रसाराची गती रोखण्यात यश


लॉकडाऊन किती काळ राहणार, याचे उत्तर कोणाकडेच नाही, जगाकडेही नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यात यश आले नसले तरी त्याची गती कमी करण्यात आपण नक्कीच यशस्वी झालो आहोत. ही काळजी घेतली नसती तर महाराष्ट्रात आणि देशात किती अनर्थ झाला असता याचा विचार ही करवत नाही. आता कोरोनानंतर संपूर्ण जग बदलणार असल्याचे बोलले जाते. हा आजार नेहमीच्या सर्दी-पडसे आणि खोकल्यासारखा नाही, गंभीर आहे, तो गांभीर्यानेच घ्यायला हवा.


Corona Update | राज्यात आज 749 रुग्ण कोरोनामुक्त, तर 2033 नवीन रुग्णांची भर एकूण आकडा 35058 वर


आरोग्य सुविधांमध्ये वाढ


मुंबईसह महाराष्ट्रात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुंबईत रुग्णसंख्या वाढल्यास पुरेशी व्यवस्था असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वरळी एनएससी डेम, रेसकोर्स, गोरेगाव नेस्को, बीकेसी, एमएमआरडीए, सिडको, मुलुंड, दहिसर- मुंबई मेट्रो, वरळी डेअरी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची व्यवस्था करण्यात येत असून हॉस्पिटलबाहेर पहिल्यांदाच ऑक्सिजनसह आयसीयू बेडसची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात 1484 कोविड केअर सेंटर्स, 2 लाख 48 हजार 600 खाटांची उपलब्धता असल्याचेही ते म्हणाले. मुंबईत 19 हजार 567 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये 5 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. वेळेत उपचार घेतले तर बरे होऊन घरी जाता येते हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


आणखी कोविड योद्धे हवेत


वैद्यकीय अधिकारी, पोलीस कामांनी थकत आहेत, त्यांची आजारी पडण्याची वाट न पहाता त्यांना आराम देण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन आणखी कोविड योद्ध्यांनी पुढे येऊन रुग्णसेवा करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


जेवढे स्वंयशिस्तीने वागाल तितके लॉकडाऊन लवकर संपेल


जितक्या स्वंयशिस्तीने वागाल तितके लॉकडाऊन लवकर संपेल. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे. अमेरिका, ब्राझील, इटली सारख्या देशात लॉकडाऊन व्यवस्थित न हाताळल्याने काय झाले हे पाहिले तर महाराष्ट्र हितासाठी मी प्रसंगी लॉकडाऊन कायम ठेवत वाईटपणा घ्यायला ही तयार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती प्रत्यक्षातली स्थिती वेगळी असल्याचे आणि ही संख्या कमी ठेवण्यात यश आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


5 लाखाहून अधिक मजुरांना त्यांच्या राज्यात सोडले


मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडून त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप जाऊ द्या ही मागणी आपण सुरुवातीपासून करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला या श्रमिकांचे अजिबात ओझे नव्हते परंतु मजुरांची त्यांच्या राज्यात, घरी जाण्याची तीव्र इच्छा होती. त्या इच्छेचा सन्मान राखत आता सुरु श्रमिक ट्रेनद्वारे 5 लाख मजूर नियोजनबद्धरित्या त्यांच्या राज्यात परतले आहेत. (रेल्वे आणि बसद्वारे) अजूनही काही मजूर रस्त्यांनी चालत जात आहेत. त्यांना आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जिथे आहात तिथेच थांबा, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला तुमच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. ट्रेन सेवा सुरु झाली आहे.


कोकणवासियांनो धीर धरा


महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना विशेषत: कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील लोक जे मुंबईत आहेत, घरी जाऊ इच्छितात त्यांना मुख्यमंत्र्यांनी घरी जाण्याची घाई करू नका, आपल्यामुळे कुटुंब आणि गावाला अडचणीत आणू नका. आपल्याला आपले ग्रीन झोन जपायचे आहेत. कोरोना व्हायरस तिथे पोहोचू द्यायचा नाही, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.


बाहेर पडतांना आता सावधनता आवश्यक


परदेशातून राज्यात लोक येत असल्याचे सांगतांना त्यांचे विलगीकरण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत घरी राहा सुरक्षित राहा असं म्हणत होतो. परंतू हळुहळु घराबाहेर पडताना आपल्याला सावधही राहावे लागेल. स्वच्छता, स्वंयशिस्त, शारीरिक अंतराचा निकष पाळावाच लागेल. नाक, डोळे,चेहऱ्याला हात लावता येणार नाही, ही सावधानता बाळगुनच भविष्यात पुढचे काही दिवस वावरावे लागेल. सुरु केलेली दुकाने, उद्योग व्यवसाय आपल्याला पुन्हा बेशिस्तीने वागून बंद होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. शैक्षणिक वर्ष, शाळा प्रवेश, ऑनलाईन शाळा यासारखे प्रश्न आहेतच. परंतु कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ दिले जाणार नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला कोरोनाचे संकट संपवायचे आहे. आपण सर्व मिळून हे संकट पूर्णपणे परतवून लावू, जनजीवन पूर्वपदावर आणू. त्यासाठी कोरानाची साखळी तोडणे, विषाणुला हद्दपार करणे आवश्यक आहे यासाठी काही काळ अजून नक्की लागेल पण आपण या युद्धात नक्की जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.



CM Thackeray Lockdown 4 | लॉकडाऊन उठवून महाराष्ट्राला धोक्यात टाकणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे