मुंबई : ‘तुमच्या डोक्यात मस्तीची भांग इतकी चढली असेल तर नाणार प्रकल्प रेटून दाखवाच’, असं थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत सेना-भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.


काल (सोमवार) नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. मात्र, त्यानंतर लागलीच भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार कुठल्याही मंत्र्याला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा तोंडघशी पडली.

त्यानंतर आज ‘सामना’तून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे. पाहा उद्धव ठाकरे  नेमकं काय म्हणाले.

‘तुमच्या डोक्यात मस्तीची भांग इतकी चढली असेल तर हा प्रकल्प पुढे रेटून दाखवाच. सुभाष देसाई हे कॅबिनेट मंत्री आहेत. भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री म्हणून घेतला आहे. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. धर्मेंद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्याने रिफायनरीच्या अरबी मालकांबरोबर ‘एमओयू’ करताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ‘हा प्रकल्प नाणारला येणारी रिफायनरी नाही.’ पण ते खोटे बोलले असे आता स्पष्ट झाले आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांनी वेगळय़ाच कंपनीशी करार केला असेल तर मुख्यमंत्री नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा का करीत नाहीत. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी हा प्रकल्प विदर्भात नेण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करायला हवी.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेनं या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री

नाणार प्रकल्प गेला, तो होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

नाणारची जमीन आधीच मारवाडी, गुजरातींना कशी मिळते? : राज ठाकरे