मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही भडकले आहेत. मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये पेट्रोल 83.33 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 71.00 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.


या दरवाढीने मोठा फटका सहन करत असलेल्या वाहतूकदार संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे मल्कित सिंग यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करुन ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर प्रतिबॅरल 105 डॉलर होते. आता ते 74 डॉलर आहेत. म्हणजेच चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमीच आहेत. तरीही  भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली दिसते.

कच्च्या तेलाचे दर वाढले आहेतच, शिवाय राज्य सरकारचे विविध कर आणि केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात भडकले आहेत.

राज्यातले आजचे दर

मुंबई - पेट्रोल 82.48 रुपये प्रति लिटर, डिझेल 70.02 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर - पेट्रोल 82.67 रुपये प्रति लिटर, डिझेल 69 रुपये प्रति लिटर

नागपूर - पेट्रोल 80.13 रुपये प्रति लिटर, डिझेल 70.75 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद - पेट्रोल 83.33 रुपये प्रति लिटर, डिझेल 71.00 रुपये प्रति लिटर

नाशिक - पेट्रोल 82.99 रुपये प्रति लिटर, डिझेल 69.76 रुपये प्रति लिटर