मुंबई: बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर यांनी शिवसेना (Shivsena) संपवायचा घाट घातला, कारण महाराष्ट्रात यांना कुणी जर रोखणारं असेल तरे ती शिवसेना आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केली. आता तर शिवसेना संपत नाही म्हटल्यावर ती चोरायला निघालेत असंही ते म्हणाले. पंतप्रधानांनी 10 वर्षात काय केलं? शेतकरी, शिक्षक, नोकरदार, विद्यार्थी यांना काय मिळालं? शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपवाले सगळं उचलून गुजरातला नेणार. राख इकडे, रांगोळी तिकडे असा सगळा प्रकार सुरू आहे. त्याचमुळे सगळे उद्योग तिकडे नेतायत आणि कोकणला बरबाद करणारी रिफायनरी इकडे आणतायत. महाराष्ट्रात जर कुणी यांना रोखणार असेल तर ती फक्त शिवसेना आहे, दुसऱ्या कुणाच्यात हिंमत नाही. त्यामुळेच ते आम्हाला संपवायला निघालेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, वय वाढत असत, ज्याक्षणी मन थकेल त्यावेळी माणसं वृद्ध होतात, पण माझ्यासमोरचे शिवसैनिक हे ज्येष्ठ नाही तर युवासैनिक आहे. इथल्या घोषणा बघून वाटतंय की पुन्हा एकदा दसरा मेळाव्यात आलोय की काय? शिवसेना नावाचा ग्रंथ अजुनही लिहिला जातोय, तुमच्यासारखी पानं नसती तर तो केव्हाच थांबला असता. आमचं लहानपण तुमच्यासोबतच गेलंय. आम्ही अरे तुरे करायचो पण हे सगळे वयानं मोठे.
शिवसेनेसमोर सध्या संकट नाही तर संधी आहे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. शिवसेनेला संपवायला जे उभे आहेत त्यांच्यात आणखी कुणाला जायचंय त्यांनी जा. शिवसेनेच्या जीवावर जे मोठे झाले त्यांनी शिवसेनेला आलेली फुलं तोडून नेली पण माझी मूळं घट्ट आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयींची आठवण
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासंबंधिची एक आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा अटलजींचं 13 दिवसांचं सरकार होतं तेव्हा अटलजींचा बाळासाहेबांना फोन आला. अटलजी म्हणाले मी तुम्हाला मंत्रीपद एकच देऊ शकतो. तेव्हा बाळासाहेब म्हणाले एकही देऊ नका तुम्ही आधी खुर्चीत बसा.
युती भाजपने तोडली
उद्धव ठाकरे म्हणाले की, 2019 ला खडसेंचा अचानक फोन आला, आपलं जमेल असं वाटत नाही म्हणाले. थोड्याफार जागांचा प्रश्न होता. चर्चेतून सोडवू असं म्हणालो पण तरी युती तोडली. आता आम्ही काँग्रेस सोबत बसलो. सन 2014 ला संपवायला निघाले, 2019 ला गद्दारी करुन युती तोडली. हिंदुत्वाचा मक्ता काही एकट्या भाजपनं घेतलेला नाही. शिवसेना शिल्लकच ठेवायची नाही हा भाजपचा अजेंडा आहे. जर हे मूळावरच आले असतील तर मी वागतोय ते चूक की बरोबर? जर मला मुख्यमंत्रीपदाची हाव असती तर मी एका मिनिटात वर्षा सोडून मातोश्रीवर गेलो नसतो.
मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवेन. भाजपकडून वचन पाळलं गेलं असतं तर हरकतच नव्हती. आताही एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार आणि हा माझा शब्द आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ही बातमी वाचा: