जालना: ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण करावं, इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या उपोषणादरम्यान कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल अशा इशाराही मनोज जरांगे ( Manoj Jarange) यांनी दिला. त्यामुळे रविवारपासून राज्यातील वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारला दिलेली वेळ संपली आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं असून आता यापुढे अन्न, पाणीच काय तर उपचारही घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर आता या आंदोलनाचे लोन राज्यभर पसरताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून राज्यभर आरक्षणासाठी आंदोलन सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
आमची मुलं मरत असताना मजा बघू नका
मनोज जरांगे म्हणाले की, गावागावात आता पुढाऱ्यांना बंदी करा. ते इकडे येऊन काय करणार आहेत. त्या आमदारांनी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणावर आवाज उठवावा. आमची मुलं मरत असताना तुम्ही मजा बघू नका, जरा गांभीर्याने घ्या, अन्यथा झेपणार नाही.
गावागावात साखळी उपोषण सुरू करा
ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आमरण उपोषण सुरू करावं आणि इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या आंदोलनाच्या दरम्यान जर कुणाला काही झालं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला.
आंबेजोगाईत तरूणाची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं लोण गावागावात पोहोचलंय. मराठा आंदोलक आज विविध ठिकाणी चांगलेच आक्रमक झाले. आंबेजोगाई तालुक्यात मराठा आंदोलकाने टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी मृतदेह समोर ठेवत आंबेजोगाईत आंदोलन केलं. तर लातूर जिल्ह्यात मांजरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलं. परभणीत नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर बीड जिल्ह्यातला एक युवक लोटांगण घालत मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचला.
40 जण मोबाईलच्या टॉवरवर चढले
राज्यात मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला धार आणखी वाढली आहे. जालन्यात ठिकठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे..जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर मराठा आंदोलकांनी चक्का जाम आंदोलन केलं. आरक्षणाची मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुसरीकडे रोहिलागड गावात 40 जणांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. मराठा आरक्षणाचा जीआर काढून मनोज जरांगेंचं आंदोलन थांबवावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
ही बातमी वाचा: