मुंबई: शिंदे-फडणवीसांच्या काळात राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपांना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. उद्योग विश्वामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण करणाऱ्या सचिन वाझेच्या मागे ठाकरे उभे होते, त्यांच्यामुळेच उद्योगांसाठी सुरक्षित अशी असलेली मुंबईची प्रतिमाही डागाळली असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांनी त्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी असंही ते म्हणाले. 


काय म्हणाले उद्योगमंत्री उदय सामंत? 


वेदांत फॉक्सकॉन, एअरबस टाटा आणि बल्क ड्रग पार्क यांसारख्या मोठ्या उद्योगांना महाराष्ट्राबाहेर जाण्यास ठाकरे सरकार जबाबदार आहे.


सन 2020 साली कोठडीतील आरोपीच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार धरून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितल्याची माहिती आहे. 


त्यानंतर, वाझे यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबाच्या निवासस्थानाखाली जिलेटिनच्या कांड्या आणि स्फोटकांनी भरलेली कार लावली. खासदार संजय राऊत (महाविकास आघाडी सरकारचे निर्माते) मार्च 2021 यांनी वाझेची पाठराखण केली आणि त्याला प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचं सांगितलं. 


या घटनेमुळे व्यापार जगतात गोंधळाची आणि अविश्वासाची लाट आली आणि राज्यावरील त्यांच्या विश्वासाला तडा गेला. त्यामुळे व्यवसायासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून मुंबईची प्रतिमाही डागाळली. ठाकरे सरकारने वाझे यांना दिलेल्या संपूर्ण पाठिंब्याने व्यवसाय आणि गुंतवणूकदारांचे मनोधैर्य खचले होते.


वाझेने केलेले कृत्य आणि त्याला दिलेले राजकीय संरक्षण हे व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी सुरक्षित ठिकाण म्हणून महाराष्ट्रावर दीर्घकाळ प्रभाव टाकेल. परंतु गेल्या एका वर्षात घेतलेल्या विविध निर्णय आणि धोरणांद्वारे आम्ही आता गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत आहोत.


महाराष्ट्र राज्यातून उद्योगधंदे बाहेर काढण्यात ठाकरे सरकारने मोठी भूमिका बजावली होती. मोठमोठ्या प्रकल्प आणण्याचे राजकारण करण्याऐवजी गुंतवणूकदारांचा राज्य सरकारवरील विश्वास उडवल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे.


 






ही बातमी वाचा: