मुंबई : मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे मोठे बंधू किरण (भैय्या) सामंत (Kiran Samant)  हे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांच्या भेटीला गेले आहे.  किरण सामंत वड्डेटीवार यांच्या भेटीला गेल्याने  राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील खासदारकीसाठी किरण सामंत हे इच्छुक आहेत. मात्र राणे पितापुत्रांचा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या जागेवरील दाव्याने सामंत विरूद्ध राणे अशी रस्सीखेच सुरू आहे. किरण सामंत हे मागील अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा असून नाराज किरण सामंत वड्डेटीवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा (BJP) डोळा आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंतानी किरण सांमत  यांच्या खासदारकीसाठी उमेदवारी मुख्यमंत्र्याकडे उमेदवारी  मागितली आहे. त्यामुळे महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये या मतदरसंघासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यात आज किरण सामंतानी घेतलेली वड्डेटीवारांची भेट ही बरीच बोलकी आहे.  तर दुसरीकडे सिंधुदुर्ग येथील विकास कामे आणि  मराठा आरक्षणावरही या दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. 


किंगमेकर अशी ओळख


किरण ऊर्फ भैय्या सामंत यांना किंगमेकर म्हणून रत्नागिरीमध्ये ओळखलं जातं. लोकांची विविध कामं हाताळताना किरण सामंत दिसून येतात. बांधकाम व्यवसायामध्ये असलेले किरण सामंत यांची एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आहे. उच्च शिक्षित असलेले किरण सामंत यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल देखील मिळवलेले आहे. सध्या किरण सामंत महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील असून विविध क्षेत्रात त्यांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. पडद्यामागे असलेले किरण सामंत उदय सामंत यांच्यापाठी खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे रत्नागिरीमध्ये त्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जाते. 


शिंदे गटाकडून किरण सामंतांच्या नावाची चर्चा


काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी याच जागेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण किरण सामंत (Kiran Samant) यांच्या खासदारकीसाठी उमेदवारी मागितली असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं. त्यांना बहुमताने निवडून आणण्याचं आवाहनही उदय सामंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलं होतं. त्यामुळे किरण सामंत यांच्या खासदारकी लढवण्याबाबतच्या चर्चेला दुजोरा दिला होता. त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील सामंतांच्या या वक्तव्याला पाठिंबा देत शिंदे गटाकडून उमेदवार हे किरण सामंत असतील असं म्हटलं. त्यामुळे शिंदे गटाकडून जरी उमेदवार निश्चित झाला तरी महायुतीच्या जागावाटपामध्ये ही जागा कोणाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.