मुंबई : परदेशी नागरिक असल्याचं सांगून फसवणूक करणाऱ्या दोन इराणी नागरिकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. "आम्ही परदेशी नागरिक आहोत, भारतीय चलन कसं असतं ते आम्हाला दाखवा," असं सांगत हातचलाखी करुन या दोघांनी एकाची दहा हजार रुपयांना फसवणूक केली होती. मुंबईतील अंधेरी पोलिसांनी बुधवारी (8 जानेवारी) दोन्ही आरोपींना गजाआड केलं.

आझाद अब्दुल हमीद सिराज सिमीया (वय 54 वर्ष)  आणि इजाज हुसेन नरीमल हमदानी (वय 58 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. या दोघांनी अंधेरी परिसरात अशाच प्रकारे एकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून दहा हजार रुपये लंपास करत पळ काढला होता. या प्रकरणी अंधेरी पोलिसात तक्रार दाखल झाली होती.  त्यानंतर त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 420 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

त्यानुसार, अंधेरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय बेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे विभाग) बळवंत देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ, उपनिरीक्षक रवीराज कट्टे, हवालदार संख्ये यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने दोघांना बेड्या ठोकल्या. दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.