मुंबई : संघ विचारांच्या कुलगुरु आणि प्र कुलगरु यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) संघाच्या विचारांचे कुलगुरु आहेत, त्यामुळे तेथे काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. तशी स्थिती राज्यात निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितलं.


जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर जो हल्ला झाला त्यामध्ये ABVP आणि भाजपच्या गुंडांना नक्कीच तेथील विद्यापीठ प्रशासनाची साथ मिळाली असणार आहे. जेएनयूचे कुलकुरु जगदीश कुमार हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहेत. गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचारांच्या लोकांना भरणा झाला आहे. त्यामुळे माझी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, जेएनयू सारखी स्थिती राज्यातील विद्यापीठांमध्ये तयार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठांमधील संघाच्या विचारसरणीच्या कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द केल्या पाहिजेत, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली.


शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने प्रभाव टाकला आहे. त्यासाठी विद्यापीठांमध्ये त्यांचे लोक महत्त्वाच्या पदांवर बसवले आहेत. म्हणून प्रत्येक विद्यापीठातील संघ विचाराच्या लोकांच्या नियुक्त्या रद्द करायला हव्यात. अन्यथा येत्या काळाच भाजपप्रणित संघटनांची लोकं राज्यातील विद्यापीठांतील वातावरण खराब करु शकतात आणि ते आम्हाला थांबवायचं आहे, असं आशिष देशमुख यांनी सांगितलं.


जेएनयूमध्ये गुंडांचा राडा, अनेक जण जखमी


जेएनयूमध्ये रविवारी (5 जानेवारी) रात्री काही गुंडानी मुलींच्या वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष ही देखील जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करताना दिसत होत्या. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या. याप्रकरणी अज्ञातांनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

संबंधित बातम्या