मुंबई : ध्वनी प्रदूषणाच्या तक्रार निवारणासाठी मुंबई पोलिसांनी ट्विटर हँडल सुरू केलं आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिक थेट आपल्या तक्रारी नोंदवू शकतील, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली. पोलिसांनीही या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत केलेल्या करावाईची हायकोर्टाला माहिती दिली.

ध्वनी प्रदूषणाविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यभरातील पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली, याची माहिती पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

राज्यात एकूण 2 हजार 388 तक्रारी आल्या, त्यावर 2 हजार 388 तक्रारींची दखल घेऊन 683 ध्वनी मापक यंत्रांद्वारे तपासणी करण्यात आली. तर 350 ठिकाणी पोलीस जाण्याआधीच वाद्य वाजवणे थाबंवण्यात आले होते. तर 2 हजार 206 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. तर 185 तक्रारींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई

राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त 1 हजार 136 तक्रारींची नोंद केली आहे. या सर्व ठिकाणी ध्वनी मापक यंत्रे मुंबई पोलिसांनी वापरले असून, एकूण 155 ठिकाणी कारवाई करुन वाद्य वाजवणे थांबवले, तर 847 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. 27 तक्रारींवर कारवाई करुन मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात ट्विटरचा वापर करुन मुंबई करांनी सर्वांत जास्त तक्रारी केल्या आहेत.

ठाणे

मुंबई पाठोपाठ ठाणेकरांनी ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवत एकूण 256 तक्रारी केल्या आहेत. त्यावर 256 तक्रारीची दखल घेतली गेली, 106 ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 150 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. तर 128 तक्रारींवर कारवाई करुन ठाणे पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे

पुणेकरांनी एकूण 567 तक्रारी केल्या. त्यावर सर्व तक्रारीची दखल घेतल सर्व ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसच एकूण 559 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. तर 8 तक्रारींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवी मुंबई

नवी मुंबईत एकूण 78 तक्रारी आल्या त्यावर 78 तक्रारींची दखल घेतली गेली, 4 ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 74 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. 4 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक

नाशिकमध्ये एकूण 35 तक्रारी आल्या, त्या 35 तक्रारीची दखल घेतली गेली, 35 ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसच एकूण 35 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे तक्रारींवर कारवाई करुन एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

नागपूर

नागपूरमध्ये देखील एकूण 286 तक्रारी आल्या, त्या 286 तक्रारीची दखल घेतली गेली, 9 ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 277 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले. त्यानुसार 9 तक्रारींवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.