अहमदाबाद/मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राजकीय हालचाली गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यातच नारायण राणे काल अहमदाबादमध्ये होते. विशेष म्हणजे याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सुद्धा अहमदाबादमध्येच होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.


नारायण राणे यांची मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी भेट झाली का, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. मात्र, नारायण राणे अहमदाबादेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

नारायण राणे मुंबईला रवाना होत असताना विमानतळावर एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणेंनी माध्यमांशी बोलण्याचं टाळलं.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, नारायण राणे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह हे अहमदाबादेत असतानाच नारायण राणेही अहमदाबादमध्येच असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.

नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास

– 1968 – वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश

– 1968 – शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी

– 1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले

– 1990-95 – नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर

– 1991 – छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले

– 1990-95 – याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद

– 1996-99 – युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान

– 1999 – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड

– 2005 – शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली

– 2005 – शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-2005 – शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी

– 2005 – आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड

– 2007 – काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड

– 2009 – विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण

– 2014 – लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा

– 2014 – मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा

संबंधित बातम्या :


नारायण राणे यांचा राजकीय प्रवास


नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार?