मुंबई: आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत  तुम्हाला तुमच्या उमेदवारांची संपूर्ण माहिती घर बसल्या मिळणार आहे. याशिवाय घरापासून मतदान केंद्र किती दूर आहे,तसेच कोणत्या बूथवर त्यांना मतदान करायचे आहे, याचीही माहिती घर बसल्या मिळणार आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाने True Voter हे नवे अॅप तयार केले असून, आगामी सर्व निवडणुकीदरम्यान हे अॅप कार्यरत असणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत केला. यावेळी मतदारांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे अॅप कार्यरत असणार आहे.

निवडणूक आयोगाचे हे नवे अॅप प्ले स्टोअर्सवर उपलब्ध असून, या अॅपच्या माध्यमातून मतदार आपले मतदार यादीतील नाव सहज शोधू शकतील. विशेष म्हणजे, निवडणूक क्षेत्रात कोणता उमेदवार उभा आहे, त्याची सर्व माहिती या अॅपवर उपलब्ध असेल. यामध्ये उमेदवाराची संपत्ती, त्याचे शिक्षण, त्याच्या विरोधात दाखल असलेले गुन्हे, आदीची सर्व माहिती या अॅपवरुन उपलब्ध असेल.

हे अॅप केवळ मतदारांनाच नव्हे, तर उमेदवारालाही तितकेच उपयोगाचे असणार आहे. कारण, या अॅपवरुन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, उमेदवाराने किती खर्च केला, याचा हिशेब उमेदवाराला आयोगाला द्यावा लागतो. हा सर्व खर्च उमेदवाराला या अॅपच्या माध्यामातून निवडणूक आयोगाला देता येणार आहे.

या अॅपला नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही हे अॅप लॉन्च करणार असल्याची माहीती राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. साहारिया यांनी दिली.

असं शोधा तुमचं नाव :
- गूगल प्ले स्टोअरवरुन True Voter हे अॅप डाऊनलोड करा

- अॅप डाऊनलोड करुन इन्स्टॉल झाल्यावर ओपन करा



- अॅपवर क्लिक केल्यावर Search In CEO Voter List, SEC Voter List Search, Login, New Registration, Help, KYC हे ऑप्शन येतील. त्यापैकी SEC Voter List Search या ऑप्शनवर क्लिक करा


- त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो 'Select District'. त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.

- त्या पुढचा पर्याय 'Select Assembly'. म्हणजेच तुमचा मतदारसंघ. त्या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा

- त्यानंतर तुमचं नाव टाका. (तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करणं बंधनकारक आहे.)

- नंतर तुमचं आडनाव टाका.



- हे सर्व रखाने भरल्यानंतर 'Search' या पर्यायवर क्लिक करा.

ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल. ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतरही नाव न आल्यास, नावाची स्पेलिंग पुन्हा एकदा चेक करा. लक्षात ठेवा की, सर्च करताना तुमचं नाव आणि उर्वरित तपशील इंग्रजीत भरावयाचा आहे.