मुंबई : टीआरपी फ्रॉड प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेग घेत आहे. मुंबई क्राईम ब्रांचने उद्या सहा जणांना चौकशीसाठी बोलावलं आहे. ज्यामध्ये 4 रिपब्लिकचे वरिष्ठ अधिकारी तर हंसा एजन्सीचे 2 अधिकारी आहेत. विकास खानचंदानी सकाळी 9 वाजता, हर्ष भंडारी आणि घनश्याम सिंग यांना सकाळी 11 वाजता तर प्रिया मुखर्जी यांना 1 वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.


या सहाजणांमध्ये रिपब्लिकचे CEO विकास खानचंदानी, COO (चीफ ओप्रेटिंग ऑफिसर) हर्ष भंडारी, प्रिया मुखर्जी आणि घनश्याम सिंग जे रिपब्लिक चॅनेलचे डिस्ट्रीब्यूशन हेड आहेत. त्यांना उद्या दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. तर हंसा एजन्सीचे COO आणि एका कर्मचाऱ्याला उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.


टीआरपी फ्रॉडमध्ये 3 चॅनेलची नावं समोर आली होती. ज्यामध्ये बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या दोन मराठी चॅनेलचा तर वृत्तवाहिनी रिपब्लिकचा समावेश आहे. बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी यांच्या संस्थापक शिरीष पतनशेट्टी आणि नारायण शर्मा या सर्वांना अटक करण्यात आली असून हंसा एजन्सीचे माजी कर्मचारी विशाल भंडारी, बोपल्ली राव या दोघांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. तर हंसा एजन्सीचे माजी कर्मचारी दिनेश विश्वकर्मा आणि विनय त्रिपाठी यांचा शोध मुंबई पोलिसांकडून घेतला जात आहे. मुंबईमध्ये टीआरपी मोजमाप करणारे बॅरोमीटर दोन हजाराच्या आसपास आहेत. ज्यापैकी 83 बॅरोमीटर विशाल भंडारीच्या देखरेखीत होते. लोकांना भेटून विशाल भंडारीने रिपब्लिक चॅनेल पाहण्यास सांगितले आणि त्यांना 400 ते 500 रुपये दिल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.


मुंबई पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त; रिपब्लिक टीव्हीची चौकशी सुरू


रिपब्लिक चॅनेल जाहिरात आणून देणाऱ्या एजन्सी लिंट्स आणि मेडिसन चेअरमेन शशी सिंह आणि सॅम बलसारा यांची 8 तास चौकशी करण्यात आली असून त्यांच्याकडून गेल्या दोन वर्षातील त्यांच्याकडील असलेली क्लाइन्ट्सची नावे आणि त्यांना किती जाहिराती दिल्या तसेच त्यांचं झालेलं पेमेंट या सर्वांची कागदपत्रे मुंबई क्राईम ब्रांचने मागवली आहेत. तर रिपब्लिक चॅनेल फायनान्स ऑफिसर सुब्रमण्यम यांनासुद्धा आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्याने मुंबईच्या बाहेर असल्याचं कारण देत सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल केली आहे. चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दाखवली. तर घनश्याम सिंग यांना उद्या दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत.


जे फरार आरोपी आहेत. त्यांच्या शोधासाठी सहा राज्यांमध्ये मुंबई क्राइम ब्रांच पथक पाठवण्यात आलं आहे, तर रिपब्लिक चॅनेलच्या अकाउंटची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. तसेच आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सुद्धा रिपब्लिकमध्ये आर्थिक उलाढालीबाबत चौकशी होणार आहे. वेळ पडल्यास मुंबई क्राईम ब्रांच त्यांची सुद्धा मदत घेणार आहेत. मुंबई क्राईम ब्रांच सेंट्रल इंटेलिजन्स युनिटकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांच्या नेतृत्वाखाली संतोष कोतवाल, नितीन लोंढे, प्रकाश होवाळ आणि रियाझ काझी या पथकाकडून तपास केला जात आहे.


TRP SCAM | टीआरपी घोटाळा : 'रिपब्लिक'चे अधिकारी चौकशीसाठी जाणार नाहीत