मुंबई : माध्यम क्षेत्रात खळबळ माजवणारी एक बातमी हाती आली आहे. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखील अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. रिपब्लिक टीव्हीची देखील यात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


माध्यमांमध्ये टीआरपीला (TRP) अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार असल्याचे मुंबई पोलीस परमबीर सिंह यांनी सांगितले आहे. याच संदर्भात मराठीतील फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिनीच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. टीआरपी रेटींगचं सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीचा डेटा लिक झाल्याचीही माहिती मिळत आहे. यात कंपनीचे काही जुने तर काही विद्यमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासाठी घरात विशिष्ट चॅनेल सुरु ठेवण्यासाठी पैसे दिले जात होते. दरम्यान, काही दिवसांपासून वादात असलेला रिपब्लिकचे चालकही यात सहभागी असल्याचा शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


ते म्हणाले, “BARC ही संस्था टीआरपी मोजण्याचे काम देशात करते. ही संस्था वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावते, देशात सुमारे 30 हजार बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबईत सुमारे 10 हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसांसोबत काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवरून डेटा शेअर करत असल्याचे उघड झाले आहे. हे कामगार लोकांना घरात विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यासाठी पैसे द्यायचे. जे लोक अशिक्षित आहेत त्यांच्या घरी इंग्रजी चॅनेल पाहिले जात असल्याची माहिती आहे.


परमबीर सिंह म्हणाले, आम्ही हंसाच्या माजी कामगाराला अटक केली आहे. या आधारे तपास वाढविण्यात आला. दोन जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असून त्यांना 9 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी देण्यात आली आहे. त्याच्या काही साथीदारांचा शोध घेत आहोत. काही मुंबईत आहेत तर काही मुंबईबाहेर आहेत. ते चॅनेलनुसार पैसे द्यायचे. पकडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले असून आठ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.


रिपब्लिक टीव्हीने आरोप फेटाळले 


रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी निवेदन जारी केले आहे की, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी रिपब्लिक टीव्हीवर खोटे आरोप लावले आहेत. कारण सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आम्ही त्यांना विचारपूस केली होती. रिपब्लिक टीव्ही मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहे. रिपब्लिक टीव्हीचा उल्लेख असलेला एकही बीएआरसी अहवाल नाही.

भारतातील लोकांना सत्य माहित आहे. पालघर, सुशांतसिंग राजपूत प्रकरण किंवा इतर कोणत्याही घटनेबद्दल रिपब्लिक टीव्हीच्या अहवालामुळे ही कारवाई केली आहे. अशा प्रकारे लक्ष्य केल्याने रिपब्लिक टीव्ही अधिक चांगली काम करणार आहे. परमबीर सिंह आज पूर्णपणे उघडे पडले आहेत, कारण BARC ने कोणत्याही तक्रारीत रिपब्लिकचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी अधिकृत क्षमा मागितली पाहिजे आणि कोर्टात आमचा सामना करण्यास तयार राहावे.

BARC ने एक निवेदन जारी केले आहे की, BARC इंडिया मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांचे कौतुक करते आणि मुंबई पोलिसांना पाठिंबा देईल. बीएआरसी प्रामाणिकपणे देश काय पाहतो हेच सांगते. एबीपी न्यूजने हंसा रिसर्च एजन्सीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Fake TRP Racket | टीआरपी रेटिंग रॅकेटवर मुंबई पोलिसांची झडप, #RepublicTV ची चौकशी सुरू