मुंबई: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुरुवारी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काऊंसिल (BARC) चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली आहे. दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाणे क्षेत्रातून अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 वी अटक आहे.  एका अधिकाऱ्याने सांगितलं की, दासगुप्ता यांना राजगड परिसरातून अटक केलं आहे आज, शुक्रवारी त्यांना स्थानिक कोर्टात आणलं जाईल. मुंबई पोलिसांनी याआधी BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया (Romil Ramgarhia) यांना अटक केली आहे.  बार्क या प्रेक्षक संख्येची पाहणी करणाऱ्या संस्थेशी संबंधित  रोमिल रामगढिया यांच्यानंतर पार्थ यांची दुसरी अटक आहे. पार्थ दासगुप्ता यांना 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


बार्क BARC म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही टीव्ही चॅनेल्सची प्रेक्षकसंख्या मोजणारी संस्था आहे. या संस्थेनेच सुचवल्यावरुन मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरु केला होता. त्या बार्क संस्थेच्या माजी कार्यकारी प्रमुखाला म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला याआधीच अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिस आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ईडीने सुद्धा या प्रकरणी चौकशी सुरु केली होती.


TRP घोटाळा : BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक; या प्रकरणातली चौदावी अटक


टीआरपी घोटाळ्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी (Republic CEO Vikas Khanchandani) यांना अटक केल्यानंतर रोमिल रामगढिया यांना केली होती. आता BARC चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना करण्यात आलेली अटक महत्वपूर्ण मानली जातेय.


या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्वात आधी हंसा रिसर्च या संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली होती. हंसा रिसर्चच्या दोन कर्मचाऱ्यांसोबतच फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या मराठी चॅनेलच्या मालकांनाही अटक करण्यात आली होती.


पुढील 12 आठवड्यांसाठी टीआरपीला स्थगिती, टीआरपी घोटाळ्यानंतर BARC चा निर्णय


या घोटाळ्याप्रकरणी सर्वात आधी अटक करण्यात आलेले हंसा रिसर्चचे कर्मचारी ज्या घरात पीपल मीटर बसवण्यात आलं आहे, त्यांना ठराविक चॅनेल पाहण्यासाठी पैसे देत असल्याचा आरोप पोलिसांनी तपास केल्यानंतर केला होता.


मुंबई पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त
माध्यम क्षेत्रात खळबळ माजवणारी एक बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली होती. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखील अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. रिपब्लिक टीव्हीची देखील याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.