मुंबई : मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात भर रस्त्यात दुचाकीस्वाराला जोरदार धडक देणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिग्नलवर दुचाकीस्वारासोबत वाद झाल्याने रिक्षाचालकाने सिग्नल सुटल्यावर संबंधित दुचाकीस्वाराला रस्त्यातच जोरदार धडक देऊन पळ काढला होता. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वार खाली पडला. ही संपूर्ण घटना एका कारच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना 17 डिसेंबरची असल्याचं कळतंय.
घाटकोपरच्या माता रमाबाई नगरमध्ये रहाणारे किशोर कर्डक हे कामानिमित्त त्यांच्या दुचाकीवरून घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरून शिवाजी नगरला जात होते. यावेळी रिक्षा चालक सलमान सय्यद हा रिक्षा चालक भरधाव वेगात त्यांच्या बाजूने रिक्षा घेऊन गेला आणि रिक्षाचे चाक किशोर यांच्या पायावरून गेले. यावेळी किशोर यांनी फ्री वेच्या ब्रिज खाली असलेल्या सिग्नल जवळ त्या रिक्षा चालकाला गाठत त्याला जाब विचारू लागले. यावेळी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. सिग्नल सुटला आणि दोघेही पुढे निघाले तेव्हा रिक्षा चालकाने मुद्दाम किशोर यांना जोरदार धडक दिली आणि पळ काढला.
सुदैवाने या घटनेत किशोर यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यांच्या जीवावर हे बेतले असते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर देवनार पोलिसांनी दुचाकीस्वार आणि या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. रिक्षा चालकाला रफिक नगरमधून ताब्यात घेण्यात आले तर किशोर कर्डक यांना देखील संपर्क करून गुन्हा नोंदविण्यास बोलविण्यात आले. या प्रकरणी देवनार पोलिसानी हत्येचा प्रयत्न सारखा गंभीर गुन्हा नोंदविला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी या मुजोर रिक्षाचालकाची रिक्षा जप्त करून त्याला बेड्या जरी ठोकल्या असल्या तरी अश्या रिक्षा चालकांच्या बाबत प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संबंधित बातमी :
अल्पवयीन मुलाच्या हातात वाहनाचे स्टेरिंग देणं भोवलं, वडिलांना घडली तुरुंगवारी
कैद्यांसाठीचे कपडे घालण्यास इंद्राणी मुखर्जीचा नकार, विशेष सीबीआय कोर्टात याचिका
मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नववधूकडून बेडरूममध्ये गळा आवळून पतीची हत्या
कट मारल्याच्या वादातून रिक्षावाल्याने बाईकस्वाराला उडवलं, मुंबई पोलिसांकडून मुजोर रिक्षाचालक ताब्यात