मुंबई : मुंबई पोलिसांनी मागील आठवड्यातच टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर जाहिरातदार मोठा निर्णय घेत आहेत. बजाज ऑटोपाठोपाठ आता बिस्किटांचं उत्पादन करणाऱ्या पार्ले कंपनीनेही काही वृत्तवाहिन्यांवर आपल्या जाहिराती न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड केल्यानंतर आम्ही यावर लक्ष ठेवून असल्याचं प्रमुख जाहिरातदार आणि मीडिया एजन्सीने म्हटलं आहे.


द्वेष पसरवणाऱ्या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी दिली. ते म्हणाले की, "आम्ही अशी शक्यता पडताळत आहोत, ज्यात इतर जाहिरातदार एकत्र येतील आणि वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देण्याच्या आपल्या खर्चाला आळा घालतील, जेणेकरुन वृत्तवाहिन्यांना स्पष्ट संकेत जाईल की, त्यांना आपल्या मजकुरात बदल करणं गरजेचं आहे. आक्रमकता आणि द्वेष वाढवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या वाहिन्यांवर आम्हाला खर्च करायचा नाही, कारण ते आमचे ग्राहक नाहीत.





मुंबई पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त; रिपब्लिक टीव्हीची चौकशी सुरु


लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जी बिस्किटांची जबरदस्त विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला!


पार्लेचं सोशल मीडियावर कौतुक
कंपनीच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. "हे देशासाठी चांगलं आहे," असं एका ट्विटर युझरने म्हटलं तर "उत्तम निर्णय" अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने दिली. "फारच उत्तम, सन्मान, जास्तीत जास्त कंपन्यांनी या मार्गावर चालायला हवं," असं एकाने ट्वीट केलं आहे. तर "ही फक्त सुरुवात असू शकते, अपेक्षा आहे की अधिकाधिक कंपन्या याचं पालन करतील आणि आपल्याला एक सकारात्मक बदल पाहायला मिळेल," असं ट्वीट आणखी एका ट्विटर युझरने केलं आहे.


बजाजकडून तीन कंपन्या ब्लॅकलिस्ट
दरम्यान पार्लेच्या आधी उद्योजक आणि बजाज ऑटोचं व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी तीन वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट केल्याचं सांगितलं होतं. राजीव बजाज म्हणाले होते की, "एक मजबूत ब्रॅण्ड असा पाया असतो ज्यावर तुम्ही एक मजबूत व्यवसाय उभा करता. अखेर एका व्यवसायाचा उद्देशही सामाजात काही योगदान देण्याचा असतो. आमचा ब्रॅण्ड कधीही अशा कोणाशीच जोडलेला नाही जे समाजात द्वेष पसरवण्याचा स्रोत असल्याचं आम्हाला वाटतं."