ठाणे : रक्तदानाचे खरे महत्त्व आपल्याला या covid-19 च्या दिवसातच लक्षात आले. प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाल्यानंतर सर्वत्र प्लाझ्माची मागणी वाढू लागली. मात्र कोणीही पुढे येऊन रक्त किंवा प्लाझ्मा दान करायला तयार नव्हते. अशावेळी मुंबईतील एक तरुण पुढे आला. त्याने प्लाझ्माचे महत्त्व समजून घेतले आणि हा प्लाझ्मा दान करण्यासाठी त्याने अनेकांना प्रवृत्त केले. त्याचे नाव आहे विश्वास दाते.


विश्वास हा भांडुप इथे राहणारा असून, एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर कामाला आहे. अडीच महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे एका कोरोना रुग्णाला प्लाझ्माची आवश्यकता होती. त्यावेळी कुठेच प्लाझ्मा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी विश्वासशी संपर्क साधला. या रुग्णाच्या नातेवाईकांनी तब्बल दीड लाख रुपयांना एक बॅग विकत घेतली होती. मात्र दुसरी बॅग मिळत नव्हती. हे समजल्यानंतर विश्वासने त्यांना मदत तर केलीच पण अशा प्लाझ्माची आवश्यकता असलेल्या इतर रुग्णांना देखील मदत करायचा विडा उचलला.


आताही मुंबईसारख्या शहरात रक्तपेढ्यांमध्ये रक्त आणि प्लाझ्मा उपलब्ध नाही. ज्याठिकाणी उपलब्ध आहे तिथे अतिशय जास्त किंमत मोजावी लागते. तसेच एका बॅगच्या बदल्यात दोन रक्तदाते पुरवावे लागतात. या अडचणी लक्षात येताच विश्वासने अर्पण रक्तपेढीसोबत बैठक करुन अतिशय कमी किमतीत आणि प्लाझ्माच्या ऐवजी दुसरा डोनर उपलब्ध नसताना देखील त्याने लोकांना प्लाझ्मा मिळवून दिला. विश्वास स्वतः तर रक्तदान करतोच, पण इतरांना देखील तो प्रवृत्त करतो. या त्याच्या कामामुळे आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त कोविडच्या रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील पाच शहरात आणि रांची, जयपूर सारख्या परराज्यात देखील त्याने प्लाझ्मा पोहोचवला आहे. यासर्व कामाच्या मोबदल्यात तो एक पैसा देखील घेत नाही.



त्याच्यासोबत काम करणाऱ्या अर्पण रक्तपेढीने देखील विश्वासला सर्वतोपरी मदत केली. हवे तेव्हा, काहीही आडकाठी न करता विश्वासला प्लाझ्मा किंवा रक्त उपलब्ध करुन दिले. मात्र अजूनही रक्ताची कमतरता असल्याने, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन रक्तपेढीने केले आहे. तसेच कोविडमधून बरे झालेल्यांनी देखील प्लाझ्मा दान करणे गरजेचे असल्याचे रक्तपेढीने सांगितले.


विश्वासमुळे जीवनदान मिळालेल्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी विश्वासचे फोन करुन किंवा प्रत्यक्ष भेटून आभार मानले आहेत. यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही, असे विश्वास म्हणतो. विश्वासने आपल्या कार्यातून अनोळख्या गरजू रुग्णांना मदत करुन त्यांच्यात देखील विश्वास निर्माण केला आहे.