भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना लसीकरण हा एकमेव आधार या पासून बचाव करण्यासाठी समोर दिसत आहे. असं असताना शहरात लस उपलब्ध नसल्याने ओरड होत असतानाच शहरातील नागरिक ग्रामीण लसीकरण केंद्रावर गर्दी करत असल्याचा अनुभव येत आहे. तर दुसरीकडे लसीकरण करण्यासाठी गावात कोणी येईल या भीतीने गावा बाहेरील जंगलात दिवसभर लपून बसणारे नागरिक सुद्धा आढळून येत आहेत. ठाणे जिल्ह्यापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर भिवंडी तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील हे वास्तव विदारक आहे.
लसीकरण करण्यासाठीची ऑनलाईन पद्धती ग्रामीण अशिक्षित जनतेला समजत नसल्याने ग्रामीण भागात ऑफलाईन लसीकरण व्हावे अशी मागणी वाढत असतानाच आदिवासी समाज आज ही कपोलकल्पित भीतीने या लसीकरणापासून दूर पळत असल्याची आकडेवारी समोर आले आहे. हे कळताच जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांनी आदिवासी विकास क्षेत्र कार्यक्षेत्रात येणाऱ्या चिंबी पाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंगे यांसोबत भेट देत तेथील लसीकरणाची माहिती करून घेत या परिसरातील खडकी बुद्रुक,आमराई ,कुंभारपाड , चिंबीपाडा ,बालखडी , पिंपळशेत,म्हसकर पाडा या आदिवासी पाड्यांना भेटी देऊन तेथील बायबापड्यांसह जमिनीवर बैठक मारून त्यांची समजूत काढली.
काय आहेत आदिवासींच्या मनातील भीती
लस उपलब्ध नसल्याने शहरी भागात नागरिकांची ओरड होत असून ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर त्यांची गर्दी ओसंडून वाढत आहे. परंतु आज ही ग्रामीण भागातील आदिवासी समाज आजही लसीकरणापासून लांब पळत आहे. इतकेच नव्हे तर अनेक पाड्या वस्त्यांवरील आदिवासी समाज बांधव सकाळी लसीकरणासाठी पकडून घेऊन जातील म्हणून जंगलात पळून जातात. ही लस घेतली की आपण मरणार ,आपल्याला इतर आजार जडतील,लस द्यायला घेऊन जातील आणि इतर अवयव काढून घेतली या कपोलकल्पित भीतीने या अशिक्षित समाज बांधवांच्या मनात घर केले आहे .त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागात आज ही लसीकरण अत्यल्प झाले असून त्यामध्ये आदिवासी समाजाचा टक्का नगण्य आहे.
आपण शहरी भागात राहणारे लसीकरणासाठी धावपळ करीत असताना ग्रामीण भागातील आदिवासी समाज लसीकरणापासून दूर पळत आहे. त्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्था सुशिक्षित समाज घटक या सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून या समाजाला लसीकरण सुरक्षित व आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचा विश्वास या समाजाला देणे गरजेचे असल्याचे सांगत ग्रामीण भागात लसीकरण ऑनलाईन नाव नोंदणी शक्य नसल्याने ऑफलाईन लसीकरण सुरू केले असल्याची माहिती कुंदन पाटील यांनी दिली आहे .
आम्ही दिवसभर शेतात रानात काबाडकष्ट करत असून कोरोनाने आमच्या पाड्यात अजून शिरकाव केलेला नाही. आम्हाला कोणता आजार नाही. मग आम्ही लस कशाला घ्यायची, असा सवाल उपस्थित करीत ज्यांना गरज आहे त्यांना लस द्या असा प्रतिप्रश्न जनजागृती करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रखमाबाई या महिलेने केला. एकूणच लसीकरण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी या समाजातील लसीबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी शासन प्रशासन यांना अजून बरीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे एवढे नक्की.