मुंबई : कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी जगातील कित्येक देशांनी लॉकडाऊन लागू केला. कोरोनापासून वाचवणाऱ्या या लॉकडाऊनने आणखी एका समस्येतून बाहेर काढलं ते म्हणजे प्रदूषण. परंतु मुंबईमध्ये मात्र प्रदूषणात घट होण्याऐवजी वाढ झाल्याचा अहवाल आयआयटीएम पुणे अंतर्गत येणाऱ्या सिस्टीम आॅफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग ॲंड रिसर्च म्हणजे सफर या संस्थेने  दिला आहे. 
 
 मुंबईच्या हवेत जीवघेणे सूक्ष्मकण सोडण्याचे वाहतूक क्षेत्राचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत दु्प्पट झाले आहे.  त्यामुळे आधीच बिघडत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेचा स्तर अधिक घसरवणारा सर्वात मोठा स्त्रोत बनला आहे. पीएम 2.5 च्या उत्सर्जनामध्ये मुंबईत गेल्या पाच वर्षांत वाहतूक क्षेत्रामुळे भयंकर वाढ झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईत गेल्या दशकभरात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांची वाढलेली संख्या आणि सिग्नलवर वारंवार होणारी वाहतूक कोंडी या दोन्हींचा हा एकत्रित परिणाम आहे.
 
वाहतूक अभ्यासक  अशोक दातार म्हणाले, मुंबई तीन बाजुंनी समुद्राने वेढलेली असल्याने  स्वच्छ हवा येते. मात्र, हवा आत आली की प्रदूषित होते. मुंबईमध्ये उंच इमारती होत आहे. त्यामुळे उंच इमारती  होत आहेत.  वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे. वायू प्रदूषणाबरोबर  पार्किंग आणि इतर गोष्टींची समस्या देखील आहे.  कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाला आहे. 
 
सफरच्या 2019-20  सालच्या रिपोर्टनुसार  पीएम 2.5 च्या उत्सर्जनात 2016-17 या वर्षात 16 टक्के असलेला वाहतूक क्षेत्राचा वाटा तब्बल 30.5 टक्क्यांवर गेला आहे. सूक्ष्म आकार असल्याने पीएम 2.5  हे आरोग्यासाठी अधिक धोकादायक असतात. या कणांना चिकटून कोरोना विषाणू फुप्फुसात प्रवेश करू शकतो असा देखील एक अहवाल समोर आला होता
 
पीएम 2.5  कणांच्या उत्सर्जनात  कोणत्या क्षेत्राचा किती वाटा?
 
क्षेत्र 2016-17 2019-20
वाहतूक 16 % 30.5%
घरगुती ज्वलन 27% 15%
उद्योग 36% 18%
वाऱ्याने उडवलेली धूळ 21% 15%
इतर NA 21.5%
 
मुंबई खूप मोठ्या प्रमाणावर  रेल्वे वाहतुकीवर अवलंबून आहे. परंतु कोरोनाकाळात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ही फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठी सुरू आहे. त्यामुळे नाईलाजाने मुंबईकरांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मुंबईच्या विकासात जेवढा लोकलचा वाटा आहे तेवढाच प्रदूषण नियंत्रित राखण्याचा  देखील आहे. वायू प्रदूषणाला सर्वाधिक जबाबदार वाहन क्षेत्रच होते. शहरातील वाहनं आणि त्यांचा प्रवास तातडीने कमी करण्याची आवश्यकता आहे.
 
प्रदूषणामुळे कित्येक लोकं आपला जीव गमावतात. तर काही जणांना अस्थमा, अॅलर्जी, मायग्रेनसारख्या समस्यांचा आयुष्यभर सामना करावा लागतो.  मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे येथे वाहतूक क्षेत्राची वाढ होणारच आहे, याची आपल्याला जाणीव आहे. मात्र आता धोक्याची घंटा वाजायला सुरू झाली असून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.