मुंबई : मुंबईतील टोरेस घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु करण्यात आला आहे. टोरेसची सर्व कार्यालयं सील करण्यात आली आहेत. तर, टोरेसची तीन बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. या प्रकरणी आणखी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे टोरेसकडून गुंतवणूकदारांना 300 रुपयांचे मोइसॅनाइटच्या खड्यांची विक्री करण्यात आली होती. मोइसॅनाइटचा एक खडा भारतीय बाजारात 300 रुपयांना मिळत असून तो 42- 50 हजार रुपयांना विकण्यात आला. यासोबत एक प्रमाणपत्र देखील देण्यात येत असे, अशी माहिती समोर आली आहे. त्याशिवाय पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपी तानिया कसातोवाच्या घरातून 77 लाखांची रक्कम जप्त केल्याची माहिती आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी संग्रामसिंह निशानदार यांनी गुरुवारी सकाळपासून सुरु करण्यात आलेली छापेमारी शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरु होती अशी माहिती दिली. पोलिसांनी आरोपी उझबेकिस्तानची नागरिक तानिया कसातोव्हाच्या घरातून 77 लाख रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच कोटी रुपये जप्त केले आहेत.
जे लोक मोइसॅनाइटचा खडा डायमंड म्हणून खरेदी करतील त्यांना इन्सेटिव्ह दिला जाईल, महिन्याभरात 10 ते 15 टक्के परतावा मिळेल, असं सांगितलं जायचं. याशिवाय एखाद्या ग्राहकानं इतरांना टोरेसमध्ये पैसे गुंतवण्यासाठी जोडल्यास त्याला देखील प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, असं आश्वासन दिलं गेलं होतं. या प्रकारे टोरेस घोटाळा सुरु होता.
टोरेसचा भांडाफोड कसा झाला?
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 5 जानेवारीला दादरच्या टोरेसच्या शोरुममध्ये एका बैठकीत कर्मचारी आणि कंपनीच्या व्यवस्थापनात पगारावरुन वाद झाला. त्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी पगाराबाबत चिंता व्यक्त करत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली.त्यांच्या सोबत काही गुंतवणूकदार देखील पोलीस स्टेशनला पोहोचले आणि हे प्रकरण पुढं आलं.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. उझबेकिस्तानची नागरिक तानिया कसातोव्हा, रशियाची वॅलेंटिना गणेश कुमार, सर्वेश सुर्वे यांना अटक करण्यात आली आहे. जॉन कार्टर, ओलेना स्टोइन आणि विक्टोरिया फरार आहेत. टोरेसचे अकाऊंटट अभिषेक गुप्ता यांनी डिसेंबर महिन्यात 100 पानांचा एक मेल पोलिसांना केला होता. ज्यामध्ये टोरेस संदर्भातील अनेक गोष्टी पोलिसांना कळवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, मुंबई, नवी मुंबईतील जवळपास अंदाजे सव्वा लाख गुंतवणूकदारांनी टोरेसमध्ये पैशांची गुंतवणूक केली असून काही जणांनी कर्ज काढून देखील यामध्ये पैसे गुंतवले होते.
इतर बातम्या :