मुंबई : झटपट श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांना टोरेस कंपनीने गंडा घातला आहे. कुणी कर्ज काढून पैशांची गुंतवणूक केली तर कुणी सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि टोरेसच्या बोगस योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केली. आता टोरेस कंपनी मुंबई, नवी मुंबई अन् मीरा रोड परिसरातील कार्यालयांना टाळं लावून पसार झाली आहे. दादरच्या कार्यालयातून रक्कम, दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.  



टोरेस कंपनीनं जवळपास 3 लाख मुंबईकरांना गंडा घातल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी उझबेकिस्तानची रहिवासी असलेली जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे.  तिघेही दादर कार्यालयातील रक्कम, दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली.


कंपनीचे संस्थापक पसार?


टोरेस  कंपनीचा संस्थापक जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरीया कोवालेंको हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याचे समजते. तर मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला तौफिक रियाज आणि सीए अभिषेक गुप्ता दोघेही भारतात असून, त्यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. 


टोरेस कंपनीने दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड या सहा ठिकाणी शाखा आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानेही मंगळवारी या फसवणूक प्रकरणाचा आढावा घेतला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करणार आहे.


महिन्याला 44 टक्के परतावा देण्याचं आमिष


टोरेस कंपनीच्या माध्यमातून महिन्याला 44 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत लाखो लोकांना चुना लावण्यात आला आहे. 10 हजारांपासून 1 करोड रुपयांपर्यंत गुंतवणूक केलेल्या लोकांचे करोडो- अब्जो रुपये घेवून कंपनी व्यवस्थापन पसार झालं आहे. मुंबई , नवी मुंबई , कल्याण , मीरा भाईंदर अशा सर्वच भागातील कार्यालयांना टाळे ठोकून कंपनी पसार झाली आहे. पैसे डुबल्याने एपीएमसी मधील टोरेस कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न यावेळी गुंतवणूक दारांकडून करण्यात आला होता. 


टोरेस ज्वेलरी या ब्रँडची मालकी प्लॅटिनम हर्न प्रायवेट लिमिटेडकडे आहे. सर्वेश सुर्वे या कंपनीमध्ये संचालक होता.  फसवणूक झाल्याची माहिती मिळताच गुंतवणूकदारांनी कंपनी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. टोरेस ज्वेलर्स आणि प्लॅटिनम हर्न प्रायवेट लिमिटेडनं सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.



इतर बातम्या : 


Torres Scam Mumbai: रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?