याआधी 2017 मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल 18 टक्क्यांनी महागला होता. दर तीन वर्षांनी एक्स्प्रेसवेवरील टोलच्या दरात 18 टक्के वाढ होईल, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्येच काढली होती.
कोणत्या वाहनासाठी किती टोल?
- कारसाठी सध्या 230 रुपये टोल आकारला जातो. 1 एप्रिलपासून हा दर 270 रुपये होणार आहे.
- मिनीबससाठी 355 रुपये घेतले जातात. नव्या दरानुसार आता 420 रुपये टोल भरावा लागणार आहे
- बससाठी 675 रुपये टोल आकारला जातो. 1 एप्रिलपासून टोलसाठी 797 रुपये मोजावे लागणार आहेत.
- ट्रक टू अॅक्सलसाठी सध्या 493 रुपये टोल घेतला जातो. 1 एप्रिलपासून हा टोल 580 रुपये होणार आहे
- क्रेन, अवजड वाहने तसंच टू अॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना सध्या 1555 रुपये टोल आकारला जातो. 1 एप्रिलपासून नव्या दरानुसार 1835 रुपये टोल आकारण्यात येईल.
टोल वसुलीचं काम पुन्हा 'आयआरबी'कडेच
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स एमएसआरडीला 8 हजार 262 कोटी रुपये देणार असून कंपनीला पुढील 15 वर्ष एक्स्प्रेसवेवरील टोल वसुलीचा अधिकार असेल. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल वसुलीचं काम 'आयआरबी'कडे होतं. त्याची मुदत ऑगस्ट, 2019 मध्ये संपली होती. त्यामुळे निविदा काढल्या. सुरुवातीला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या टोल वसुलीच्या कंत्राटामध्ये अदानी ग्रुपने रस दाखवला होता, परंतु त्यांनी नंतर माघार घेतली. मागवलेल्या निविदा प्रक्रियेदरम्यान केवळ 'आयआरबी'चीच निविदा दाखल झाली होती. परिणामी हे कंत्राट आयआरबीला मिळालं. निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 'सहकार ग्लोबल कंपनी'कडे हंगामी स्वरुपात टोल वसुलीचे काम होतं.
एक्स्प्रेसवेवरील अपघातांचं प्रमाण कमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे 2002 साली बांधून पूर्ण झाला. तेव्हापासून पहिल्यांदाच या रस्त्यावर होणारे अपघात आणि अपघाती मृत्यूचं संख्या मागील वर्षी कमी झाल्याचं एका सर्व्हेमधून दिसून आलं आहे. सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि महिंद्रा अँड महिंद्रा या दोन संस्थांनी महामार्ग पोलिसांसोबत मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे, 2019 मध्ये एक्स्प्रेसवेवर होणाऱ्या अपघाती मृत्यूचं प्रमाण 43 टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं आहे.
- एक्स्प्रेसवेवर दरवर्षी 120 ते 130 अपघाती मृत्यू व्हायचे.
- 2016 मध्ये अपघाती मृत्यूचं प्रमाण 151 होतं.
- 2019 मध्ये मात्र हे प्रमाण 86 पर्यंत खाली आलं.
- सेव्ह लाईव्हज फाऊंडेशन, महिंद्रा अँड महिंद्रा यांनी महामार्ग पोलिसांसोबत मिळून केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
2002 पासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे खुला
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हा भारतातील काँक्रिटपासून निर्मित पहिला सहा पदरी द्रुतगती मार्ग आहे. याचं अधिकृत नाव 'यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग' असं आहे. याची लांबी 93 किमी आहे. मुंबई आणि पुण्याला जोडणारा हा मार्ग 2002 मध्ये सुरु करण्यात आला होता.