बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री यांनी आदर्श काम केलं आहे. परळीमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला झाडाझुडपात फेकून दिलेल्या बाळाचं पालकत्व धनंजय मुंडे यांनी स्वीकारलं आहे. या बाळाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर आहे. या मुलीचं पालकत्व स्वीकारल्याने धनंजय मुंडे यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
परळीमध्ये काल (24 फेब्रुवारी) संध्याकाळी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक बाभळीच्या काट्याच्या झुडपामध्ये कुणी तरी फेकून दिले होते. बाळाचं दैव बलवत्तर होता म्हणूनच रेल्वे रुळाच्या बाजूने जाणाऱ्यांची नजर बाळावर गेली. त्यानंतर त्यांनी बाळाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. याची माहिती बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मिळाली. त्यांनी फोनवरुन वैद्यकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
परळीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या नवजात बाळावर उपचार सुरु झाले. धनंजय मुंडे यांनी याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही दिली. या मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी उचलली आहे. खरंतर जन्मत:च तिच्या आयुष्याचा प्रवास काटेरी झुडपातून झाला आहे. त्या चिमुकलीचं नामकरण सुद्धा धनंजय मुंडे यांनी 'शिवकन्या' असं केलं आहे.
काही वर्षांपूर्वी जी परळी स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रकरणामुळे कलंकित झाली होती, त्याच परळीमध्ये आता मुलीच्या जन्मदर झपाट्याने वाढत आहे. हे बाळ कोणी फेकून दिलं याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर आहे तिच्यावर उपचार चालू आहेत. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी तत्काळ मुलीच्या उपचाराची सोय तर केलीच, शिवाय तिचे नामकरण 'शिवकन्या' असं केलं. या घटनेनंतर धनंजय मुंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.