ठाणे: अंबरनाथ-टिटवाळा रस्त्यावरील नालिंबी परिसरात सोमवारी रात्री प्रियकराची हत्या करुन प्रेयसीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घनदाट जंगलात प्रेमी युगुलांचा सुळसुळाट

अंबरनाथहून नालिंबीमार्गे टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगरदऱ्या आणि भयाण शांतता. शहराच्या दगदगीपासून शांतता मिळवण्यासाठी अनेक जण या रस्त्यावर येतात. मात्र यात सर्वाधिक संख्या असते ती प्रेमीयुगुलांची.

एकांत मिळवण्यासाठी या रस्त्यात भरपूर जागा असल्यानं अंबरनाथ आणि परिसरातून अनेक प्रेमीयुगुलं इथं येतात आणि झाडाझुडपात, खोल दऱ्यांमध्येही उतरुन बसतात. मात्र हाच प्रकार एका प्रियकराच्या जीवावर बेतला.

तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार

मूळचा शहापूरचा असलेला आणि अंबरनाथला चायनीजच्या दुकानात काम करणारा गणेश दिनकर हा त्याच्या कल्याणला राहणाऱ्या प्रेयसीला घेऊन रस्त्याच्या बाजूच्या झाडाच्या आडोशाला बसला होता. मात्र तिथे अचानक आलेल्या दोन लुटारूंनी त्याच्याकडे आधी गाडीची चावी आणि पैसे मागितले. त्याला गणेशने नकार देताच त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याच्या प्रेयसीवर बलात्कार करुन त्याची गाडी घेऊन चोरटे निघून गेले. या सगळ्या घटनेनं या परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांसमोर अनेक प्रश्न

या घटनेत प्रियकराला मारण्यासाठी चोरट्यांनी पिस्तुलाचा वापर केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. त्यात चोरटे हे स्थानिक गर्दुल्ले किंवा लुटारू असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पण स्थानिक लुटारुंकडे महागडी पिस्तुल आली कुठून? हादेखील संशोधनाचा भाग आहे. त्यामुळं हा घडवून आणलेला प्रकार तर नसावा ना? याही शक्यतेला बळ मिळालं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ३ पथकांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुढे या, तक्रार करा

सोमवारच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गणेशप्रमाणेच अनेक प्रेमवीर एकांत मिळवण्यासाठी या भागात येतात. त्यापैकी अनेकांसोबत अशा लूटमारीच्या किंवा अत्याचाराच्या घटना घडल्या असतील. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आजवर अशी एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. कारण एकच, ते म्हणजे समाजात होणारी बदनामी.. मात्र आशा घटना कुणासोबत घडल्या असतील, तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल, असं आवाहन ठाणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हल्लीच्या धावपळीच्या जगात सगळ्यांनाच एकांत आणि शांतता हवी असते. मात्र एकांताच्या नादात असुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचा आणि जोडीदाराचा जीव धोक्यात घालणं, हा मूर्खपणाच म्हणावा लागेल.

संबंधित बातमी

अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या करुन तरुणीवर बलात्कार