मुंबई : गेल्या काही महिन्यात मुंबई आणि परिसरात लागणाऱ्या आगींचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. मुंबईतील काळाचौकी परिसरात एका गोदामाला सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.

काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावर हे गोदाम आहे. या गोदामाला सकाळी भीषण आग लागली. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे 16 फायर इंजिन्स आणि पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या गोदामाच्या बाजूला काही इमारती आहेत. त्यामुळे ही आग या भागात पसरणार नाही, याची काळजी अग्निशमन दलाकडून घेतली जात आहे. या आगीमुळे सध्या या परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठले आहेत.



28 डिसेंबर 2017 रोजी मुंबईतील कमला मिल परिसरात भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नवी मुंबईतील दुकानात लागलेल्या आगीने मायलेकीचा जीव घेतला, तर अंधेरीतील प्रेसमध्ये लागलेल्या आगीत युवकाचा मृत्यू झाला होता.

त्याशिवाय गोरेगावातील गोदामाला, घाटकोपर-मानखुर्द रोडवरील गोदामांना फेब्रुवारी महिन्यात आग लागली होती.