मुरबाड : तरुणांनी गंमत म्हणून काढलेल्या टिकटॉक (Tik Tok Video) व्हिडिओनंतर तीन रिक्षाचालकांनी या तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना मुरबाड शहरात घडली आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. मुरबाड शहरातील नमस्कार हॉलमध्ये महिनाभरापूर्वी एक कपड्यांचा सेल लागला होता. या सेलमध्ये काही तरुणांनी गंमत म्हणून एक व्हिडीओ तयार केला होता.


वास्तविक पाहता या व्हिडिओत काहीही आक्षेपार्ह नसताना तब्बल महिनाभरानंतर मुरबाडच्या रिक्षा स्टॅंडवर दादागिरी करणाऱ्या कचरू टेकडे, विठ्ठल टेकडे आणि विशाल टेकडे या तिघांनी संबंधित तरुणांना बसस्टँड परिसरात बोलावून घेतलं. तिथे तुम्ही तयार केलेल्या व्हिडिओतून महिलांची छेड काढल्याचा दावा करत या तिघांनी व्हिडीओ तयार करणाऱ्या चार तरुणांना बेल्ट, दांडका आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.


इतकंच नव्हे तर या मुलांना कान धरून उठाबशा काढायला लावल्या. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ शूट करून तो या तीन गुंड रिक्षाचालकांनी व्हायरल केला. दुसरीकडे ज्या तरुणांना मारहाण करण्यात आली होती, ते तरुण मात्र घाबरून घरीच बसले.


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी या तरुणांना शोधून काढलं आणि त्यांना विश्वासात घेत तक्रार द्यायला लावली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे गुंड रिक्षाचालक कचरू टेकडे, विठ्ठल टेकडे आणि विशाल टेकडे या तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.



इतर महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha