गर्दीमुळे लोकलमधून तिघं पडले, एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2018 08:14 AM (IST)
मध्य रेल्वेवर कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यान गर्दीमुळे तोल जाऊन तिघं जण रेल्वे ट्रॅकवर पडले होते.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबईत लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दोघं जण गंभीर आहेत. मध्य रेल्वेवरील कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यान काल रात्री ही घटना घडली. गर्दीमुळे दरवाजातून तोल जाऊन तिघं जण रेल्वे ट्रॅकवर पडले होते. कुर्ला आणि सायन स्टेशनच्या दरम्यान काल (मंगळवारी) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास काही जण रेल्वे रुळांवर पडल्याचा फोन कुर्ला जीआरपीला आला. हमालांनी जाऊन रेल्वे रुळावर पडलेल्या तिघा प्रवाशांना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टरांनी एका प्रवाशाला मृत घोषित केलं, तर इतर दोघं गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आलं. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती आहे सध्या गणेशोत्सवाच्या दिवसात लोकलमध्ये प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना गर्दी टाळावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.