मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काम करणाऱऱ्या आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी अर्थात 'फ्रंटलाईन वर्कर्स' साठी कोविड लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेसह बेस्ट कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाच्या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व विभागांच्या व खात्यांच्या स्तरावर स्वतंत्रपणे नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या सर्व विभाग व खातेप्रमुखांना दिले आहेत. तसेच सर्व खाते प्रमुखांनी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आधी स्वतः लस घ्यावी व त्यानंतर आपल्या अखत्यारीतील इतर कर्मचाऱ्यांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करावे, असेही काकाणी यांनी नमूद केले आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड लसीकरण विषय बाबींसाठी गठित 'टास्क फोर्स'ची विशेष बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. महापालिकेच्या सर्व विभागांच्या / खात्यांच्या स्तरावर लसीकरण सुव्यवस्थित प्रकारे व्हावे, याकरिता समन्वय अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नेमणूक यापूर्वीच करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक विभाग / खात्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभाग / खात्यातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण योग्यप्रकारे व्हावे, यासाठी सुयोग्य नियोजन करावयाचे आहे.


कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करताना शक्यतो कार्यालयाजवळील किंवा घराजवळील लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण करवून घेण्याची व्यवस्था समन्वय अधिकाऱ्यांनी करावयाची आहे. समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्यातील कर्मचाऱ्यांचे सॉफ्टवेअरमध्ये नोंदवलेले फोन नंबर योग्य असल्याची खातरजमा करून घ्यावी. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे फोन नंबर बदलले असतील, त्यांच्याबाबत सुधारित फोन नंबरची नोंद करवून घ्यावयाची आहे. जेणेकरून कर्मचारी लसीकरण केंद्रावर जाण्यापूर्वीच फोन नंबर अद्ययावत असेल ज्यामुळे लसीकरण लवकर होण्यास मदत होईल.


कर्मचारी संख्या अधिक असलेल्या खात्यांसाठी स्वतंत्रपणे लसीकरण राबवले जाऊ शकते. यासाठी संबंधित खात्याच्या विभाग प्रमुखांनी व समन्वय अधिकाऱ्यांनी यथोचित समन्वय साधून कार्यवाही करावी. महापालिकेच्या एखाद्या खात्यातील 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी एकाच वेळी लसीकरणास जाणार असतील, तर त्यासाठी महापालिकेद्वारे वाहन व्यवस्था करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक ते नियोजन खात्याच्या समन्वय अधिकाऱ्यांनी करावयाचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मोफत लसीकरणाच्या ३ संधी मिळतील. सदर तीनही वेळेस कर्मचारी लसीकरण करण्यासाठी न गेल्यास त्याचे नाव मोफत लसीकरणाच्या यादीतून वगळण्यात येईल.


गर्भवती महिला, स्तनदा महिला यांना लसीकरणातून वगळण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कोविड बाधा झाली होती किंवा झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या दिनांकपासून 14 दिवसानंतर लसीकरण करवून घ्यावयाचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी पहिल्या लसीकरणानंतर 28 दिवसांनी दुसरे लसीकरण करावयाचे आहे. शक्य असल्यास खाते प्रमुखांनी लसीकरण करतानाचे आपले फोटो आपल्या खात्याचा 'व्हाट्सअप ग्रुप' असल्यास त्यावर शेअर करावे. जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रेरणा मिळू शकेल.