मुंबई : ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड कौशल्य आहे. सगळे महत्वाचे कलाकार ग्रामीण भागातून आले आहेत. त्यामुळे नाटक हा विषय अभ्यासात पोहोचणे आवश्यक आहे. नाटक हा पर्यायी न राहता अपरिहार्य विषय व्हावा. यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न केले आहेत आणि करत राहू, असे प्रतिपादन नाट्य दिग्दर्शक आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय, (एनएसडी) दिल्लीचे संचालक पद्मश्री वामन केंद्रे यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर बोलताना केले.
WATCH | नाट्य दिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे यांच्याशी खास बातचीत
उत्तम नाटक लिहिणाऱ्या लेखकांची आधीही वानवा होती, आजही आहे. आज समांतर नाटक शोधण्याचा रेटा कमी झालाय. बैठक असलेली माणसं आज नाहीत, अशी खंतही वामन केंद्रे यांनी व्यक्त केली. आधीचे नाटककार नोकरी केल्यासारखं सकाळपासून रात्रीपर्यंत लिहायची. दिग्दर्शक आणि लेखक ही दोन चाकं आहेत. ही दोन्ही चाकं समांतर चालणे आवश्यक आहे. आम्ही चांगलं नाटक मुख्यधारेत नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि करत राहू असेही ते म्हणाले.
भारतीय नाटकाला उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांची गरज आहे. हे उत्तम लोकं एकत्र आले तर नाटकाला उंची मिळेल, असेही केंद्रे यावेळी बोलताना म्हणाले.
वामन केंद्रेंना नाटकाची आवड कशी लागली?
नाटकाच्या आवडीबद्दल विचारले असता केंद्रे यांनी सांगितले की, लहानपणीपासून मला नाटकाची आवड होती. शाळेत केलेल्या एका नाटकात छोट्या भूमिकेला बक्षीस मिळालं होतं, अशी आठवणही त्यांनी सांगितली. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील दरडवाडी येथे झाला.एका लहानशा खेड्यातून हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी एनएसडीमधून शिक्षण घेतले. आणि त्याच एनएसडीचे ते संचालक देखील झाले. याबाबत बोलताना केंद्रे म्हणाले की, मला विश्वास बसत नव्हता एनएसडीचा डायरेक्क्टर झालो. माझं ते कधी स्वप्न कधी नव्हतं. मात्र स्वप्न पाहिलं नसताना कधी काही मिळालं तर खूप भारी वाटते. तिथं आधी काम केलेल्या मोठ्या लोकांपेक्षा काहीतरी चांगलं काम कायच होतं आणि तसेच काम करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचेही ते म्हणाले.