वसई : एका महिलेच्या सतर्कतेमुळे बँक ऑफ इंडियाचं एटीएम तोडून पैसे लुटण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. वसईच्या फादरवाडी परिसरात ही घटना घडली. सुलभा पवार असं त्या जागरुक महिलेचं नाव आहे. एटीएममध्ये चोरी होत आहे हे कळल्यावर मोठ्या धाडसाने तिथे जाऊन एटीएमच शटर बंद करुन तिने चोराला पोलिसांच्या हवाली केलं.
वसईच्या फादरवाडी येथे गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास एक चोरटा बँक ऑफ बडोदाचं एटीएम तोडून चोरी करत होता. ही बाब त्याच इमारतीत एटीएम गाळ्याच्या बाजूलाच राहणाऱ्या सुलभा पवार यांच्या लक्षात आली. धाडस दाखवून त्या तात्काळ एटीएमजवळ आल्या आणि काचेतून पाहिल्यावर चोरटा चोरी करत होता. यानंतर त्यांनी मोठ्या चलाखीने एटीएमचं शटर बंद केलं आणि बाहेरुन शटरला कुलूप लावून घेतलं आणि त्यानंतर स्थानिकांना फोन करुन बोलावून घेतलं.
स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी शटर उघडलं असता चोरटा आतच होता. चोरट्याने एटीएमची तोडफोडही केली होती. पण त्यातील पैसे चोरण्याआधीच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. महिलेच्या सतर्कतेमुळे एक सराईत चोरटा रंगेहाथ पकडल्याने सध्या सुलभा पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.