मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकवर्तीय आणि सीए यांच्यावर मागील दोन दिवसांपासून सुरु असलेली आयकर विभागाची छापेमारी अखेर बुधवारी मध्यरात्री संपली. अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्या अंधेरी इथल्या घरावर तर त्यांच्या सीएच्या वांद्रे इथल्या घर आणि कार्यालयावर दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाड टाकली होती. सलग दोन दिवस छापेमारी सुरु होती. 


आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही ठिकाणावरुन काही फाईल्स ताब्यात घेतल्या आहेत. चौकशी संपल्यानंतर संजय कदम यांनी इमारतीच्या खाली येऊन कार्यकर्त्यांची भेटही घेतली. दरम्यान मंत्री अनिल परब यांच्या सीए आणि निकटवर्तीय यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडल्याने आत आयकर विभागाच्या हाती नेमके काही लागले आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाचा छापा
परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय कदम यांच्या घरी 8 मार्च रोजी सकाळीच आयकर विभागाचे अधिकारी धडकले. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला होता.


अनिल परब यांच्या सीएच्या कार्यालयावर छापा
त्याच दिवशी दुपारी म्हणजेच 8 मार्च रोजी अनिल परब यांच्या सीएच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले होते. मुंबई वांद्रे एमआयजी परिसरातील एलिट इमारतीत ही छापेमारी करण्यात आली. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


राहुल कनाल यांच्याही निवासस्थानी छापा
याशिवाय पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या मुंबईतील निवासस्थानी देखील आयकर विभागाने छापा टाकला होता.  आयकर विभागाने कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी झाडाझडती केली. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला होता.


काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरु होतं. त्यानंतर मंगळवारी शिवसेनेशी संबंधित तिघांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. 


संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी धाडसत्र
आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवरील आयकर विभागाच्या कारवाईमुळे अनेकांना संजय राऊत यांनी याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेची आठवण झाली. कारण 15 फेब्रुवारी 2022 रोजी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. त्यादिवशी सकाळीच ईडीने मुंबईत छापेमारी केली होती. दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीवर ईडीने कारवाई केली. या कारवाईनंतर केलेल्या तपासाअंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जमीन खरेदीचं प्रकरण समोर आलं आणि त्यांना ईडीने अटक केली.