मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात भारतीय रेल्वेकडे असलेल्या इंजिनांपैकी सर्वाधिक शक्तिमान इंजिनाची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच डब्ल्यू ए जी 12 बी या शक्तीशाली इंजिनाला मध्य रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आले. याची ताकद 12 हजार हॉर्स पॉवर इतकी आहे. या इंजिनाच्या निर्मितीमुळे भारत जगातील सर्वाधिक शक्तिशाली इंजिन असलेल्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. केवळ मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी याचा उपयोग होणार आहे.


भारतीय रेल्वेने 2017 साली डब्ल्यू ए जी 12 या प्रकारातील पहिल्या इंजिनाची निर्मिती केली होती. त्या इंजिनाची निर्मिती फ्रेंच इंजिन बनवणारी कंपनी अल्स्टोम आणि बिहार येथील मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह फॅक्टरी यांनी मिळून केली होती. भारतात पहिल्यांदाज इतक्या क्षमतेच्या एंजिनाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर या इंजिनाच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या गेल्या. त्यातून डब्ल्यू ए जी 12 बी या इंजिनाची निर्मिती केली गेली. जे यशस्वी ठरल्यानंतर भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागांकडे देण्यात येत आहे.

डब्ल्यू ए जी 12 बी हे इंजिन महत्वाचे आहे कारण आता पर्यंत भारतात मालवाहतुकीसाठी 6 हजार हॉर्स पॉवरचे इंजिन सर्वाधिक शक्तिशाली इंजिन म्हणून वापरले जायचे. मात्र गाडीतील माल जास्त असेल तर अश्या 2 इंजिनांची ताकद लावावी लागायची, मात्र डब्ल्यू ए जी 12 बी हे एकच इंजिन 6 हजार टन पेक्षा जास्त लोड असलेली मालगाडी खेचू शकते. याचा वेग देखील जास्त आहे. ताशी 120 किमी च्या वेगाने हे इंजिन धावू शकते. सध्या मात्र याचा वेग ताशी 100 किमीवर मर्यादित ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या काळात ज्यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तयार होईल त्यावेळी या इंजिनाचा सर्वाधिक वापर भारतीय रेल्वे करेल. इंजिनाच्या सहाय्याने मालवाहतूक जलद होण्यास मदत होईल.

मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत भारतात तयार झालेल्या इंजिनात आईजीबीटी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तसेच रिजेनेरेटिव ब्रेक्स देखील आहेत. तसेच एलइडी लाईट्सचा वापर केला गेलाय. यामुळे वीज बचत होण्यास मदत होईल. हे भारतातील थ्री फेज, ट्वीन सेक्शन असलेले पहिले इंजिन आहे. यात लोको पायलट असलेल्या केबिनमध्ये एसीची सुविधा पाहिल्यांदाज देण्यात आली आहे.

डब्ल्यू ए जी 12 बी प्रकारातील 800 इंजिनाची निर्मिती करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे कडे आलेल्या या इंजिनाचे प्रशिक्षण आता वेगवेगळ्या विभागात लोको पायलट्सना देण्यात येत आहे.