मुंबई : मुंबईतील ताजमहाल हॉटेल हे देशातील सर्वात आलिशान हॉटेलपैकी एक आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये राजांपासून ते जगातील अनेक सेलिब्रिटींचं आदरातिथ्य केलं आहे. आदरातिथ्याच्या जगात हे हॉटेल एक मोठं नाव आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, एकेकाळी या हॉटेलमधील एका खोलीचं भाडे अवघं 6 रुपये एवढं होतं?






कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी ताजमहाल हॉटेलची जुनी जाहिरात ट्वीट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 1 डिसेंबर 1903 या दिवशी मुंबईतील ताज हॉटेलचे उद्घाटन झालं होतं. तेव्हा या हॉटेलमधील एका खोलीचे भाडे दिवसाला सहा रुपये असायचे. ही जाहिरात 1907 साली प्रकाशित झाली होती. तेव्हा मासिक पगार पाच रुपये होता. या जाहिरातीतील सर्वात अनोखी ओळ म्हणजे या हॉटेलमध्ये तीन इलेक्ट्रिक लिफ्ट, इलेक्ट्रिक दिवे आणि इलेक्ट्रिक पंखे आहेत.


तेव्हाच्या जाहिरातीमध्ये, ताजमहाल हॉटेलचे वर्णन सर्वात नवीन, सर्वात मोठे आणि पूर्व दिशेतील सर्वोत्तम हॉटेल असं करण्यात आलं होतं. हॉटेलच्या जाहिरातीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, हॉटेलमध्ये 400 हून अधिक खोल्या आणि अपार्टमेंटस् आहेत. स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे अतिशय सुसज्ज आहेत. एक मोठा डायनिंग रुम, जनरल आणि लेडीज ड्रॉईंग रुम आणि स्मोकिंग रुम आहे. हॉटेलमध्ये सर्व ठिकाणी कलात्मक सजावट करण्यात आली आहे.






हॉटेलच्या वेबसाईटनुसार, सध्या या हॉटेलमध्ये 285 खोल्या आणि स्विट आहेत. सर्व खोल्यांमध्ये समृद्ध इतिहासाची झलक पाहायला मिळते. यासोबतच ताजमहाल पॅलेस हॉटेल आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे.


26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या हॉटेलचं मोठं नुकसान झालं होतं. परंतु त्या कटू आठवणी मागे सारुन हॉटेल पुन्हा एकदा पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी सज्ज झालं. हे हॉटेल कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. मुंबईत येणारे पर्यटक ताजमहल पॅलेस हॉटेलची झलक पाहिल्याशिवाय परत जात नाहीत.