Pravin Darekar Allegation On Maha Vikas Aghadi : विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यावरुन गंभीर आरोप केला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर बोलताना दरेकर यांनी म्हटलं आहे की,  किरीट सोमय्या या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळं सोमय्या यांनाच नष्ट करावं अशा प्रकारचा कट या सरकारचा आहे. सीआयएसएफ होतं म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला. नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची हत्या झाली असती, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. यामुळं संविधानानं आमच्या पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्याकडे दिलेली आहे. त्या राज्यपालांकडे आम्ही न्यायाच्या अपेक्षेने गेलो होतो. यासंदर्भात कठोर कारवाई करा, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे, असं दरेकर म्हणाले. 


दरेकर म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांना भेटलो. सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर दबाव आणला जातोय. पोलिसांच्या मार्फत दहशतवाद करवला जातोय. याबाबत सर्व घटनाक्रम किरीट सोमय्यांनी राज्यपालांना सांगितला. चुकीचा एफआयआर नोंदवला गेला, त्याचा निषेध केला गेला. तो एफआयआर मागे घ्यावा ही मागणी केली, असं दरेकर म्हणाले. 


सर्व गोष्टी मुंबई पोलिस आयुक्ताच्या दबावाखाली


दरेकर म्हणाले की,  किरीट सोमय्यांच्या गाडीवर 60 ते 70 गुंडांच्या जमावानेहल्ला केला. मात्र सोमय्यांच्याच ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला. 50 ते 60 लोकं सीसीटीव्हीत दिसत आहे. नंतर दबाव वाढल्यावर नावाला महाडेश्वर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमय्यांनी पोलिस स्टेशनला कळवलं होतं. पोलिसांची जबाबदारी सोमय्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची होती. या सर्व गोष्टी मुंबई पोलिस आयुक्ताच्या दबावाखाली होत होत्या, हे सोमय्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. या सगळ्या गोष्टी लोकशाहीला घातक आहेत. 


जबाबदार आयुक्तांनी असं बेजबाबदार वक्तव्य करणं योग्य नाही


प्रवीण दरेकर म्हणाले की, किरीट सोमय्यांना ज्यांना झेड सेक्युरीटी आहे. त्यांच्यावर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचं. उलट आयुक्त असं म्हणतात की सीआयएसएफ त्यावेळी काय करत होतं. त्यांची अपेक्षा होती का की सीआयएसएफनं गोळीबार करावा. महाराष्ट्र पोलिस आणि सीआयएसएफमध्ये तुंबळ युद्ध व्हावं. जबाबदार आयुक्तांनी असं बेजबाबदार वक्तव्य करणं योग्य नाही. सीआयएसएफ होतं म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला. नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची हत्या झाली असती. हे महाराष्ट्राला शोभनीय नाही. आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे, गृहसचिवांकडे गेलो असतो पण हे सरकार आम्हाला न्याय देईल असं वाटत नाही. सरकार सुडाने पेटलेलं आहे. किरीट सोमय्या यांचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळं सोमय्या यांनाच नष्ट करावं अशा प्रकारचा डाव या सरकारचा आहे. संविधानानं आमच्या पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्याकडे दिलेली आहे त्या राज्यपालांकडे आम्ही न्यायाच्या अपेक्षेने गेलो होतो. यासंदर्भात कठोर कारवाई करा, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे, असं दरेकर म्हणाले.