मुंबई : आयआयटी अल्युमिनाय कौन्सिल आणि मुंबई विद्यापीठद्वारे मुंबई मेगा लॅब संकल्पना अस्तित्वात आणण्याचा काम सुरू आहे. यामध्ये मुंबईतील संपूर्ण लोकसंख्येचा विचार करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक मुंबईकराची कोरोना टेस्ट एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कशी पूर्ण करू शकू ? याबाबत तज्ज्ञांना विचार सुरू असून यातून ही मेगा लॅब तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी जगातील कंपन्यांना या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या प्रोजेक्टमध्ये देशातील आयआयटीचे आणि मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मेगा लॅब तयार करण्याच्या कामात सहभाग असणार आहे.


ही मुंबई मेगा लॅब लवकारात लवकर अस्तिवात यावी यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत नॅशनल सेंटर ऑफ नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजीचे संचालक समीर कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आतापर्यंत 15 जगातील विविध कंपन्यांनी या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यातील विश्वाससार्हता व इतर तंत्रज्ञानाच्या बाबतीत चाचपणी करून एक किंवा अधिक कंपन्याना मेगा लॅब प्रोजेक्टमध्ये सहभागी करण्याचा विचार आहे. यामध्ये व्यक्तीच्या स्वॅब टेस्टिंगपासून इतर सर्व प्रक्रिया करू शकेल अशा तंत्रज्ञानाचा वापर करून कोणताही संपर्क न करता म्हणजेच कॉन्टॅक्टलेस तपासण्या कशा करता येतील यावर भर दिला जाणार आहे'.



सद्याच्या स्थितीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असताना अधिकाधिक कोरोनाच्या तपासण्या करण्याचा या मेगा लॅबचा प्रयत्न आहे. जेणेकरुन कोरोनाचे लक्षण दिसत नसताना कोरोनाचा संसर्ग झालेले व्यक्ती सुद्धा यातून बाहेर येतील. सध्याच्या स्थितीत कोव्हीड तपासणीसाठी चार ते साडे चार हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे हा खर्च कमी होऊन सर्वांना ही तपासणी परवडेल त्या दृष्टिकोनातुन सुद्धा या मेगा लॅबमध्ये प्रयत्न करणार असल्याची माहिती समीर कुलकर्णी यांनी दिली. 15 ऑगस्टपर्यत ही लॅब सुरू करण्याचे प्रयत्न असून त्यावर काम सुरू आहे. त्यामुळे ही लॅब अस्तित्वात आल्यास कोरोनाच्या तपासणी वाढवून संसर्ग कमी होण्यास मदत होऊ शकते.