Thane Yeoor Water Updates :मुंबईला लागूनच असलेल्या स्मार्ट सिटी ठाण्यामध्ये एका बाजूला पाण्यावाचून तडफडणारे आदिवासी बांधव आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या हक्काचं पाणी कोणीतरी चोरून नेत आहे.  ठाण्यातील सर्वात जुने रहिवाशी कोण? तर येऊरच्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी बांधव. येऊर एक दुर्गम भाग असल्यापासून ते आताच्या धन दांडग्यांचे आणि महागड्या हॉटेलसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेले येऊर. हा बदल याच आदिवासींनी आपल्या तोडक्या मोडक्या मातीच्या घरात राहून बघितलाय. पण यांच्या वाट्याला काय आलं? साधं पिण्यालायक पाणी पण त्यांना मिळत नाही.


याच आदिवासी पाड्यांच्या बाजूलाच ठाण्यातल्या अनेक राजकीय व्यक्तींचे मोठमोठे बंगले आहेत. सोबतच दिवसाला लाखोंचा गल्ला कमावणारी हॉटेल्स आहेत. त्यांना 24 तास पाणी पुरवठा सुरू आहे.  


ही भीषण आणि हृदय द्रावक परिस्थिती कशी निर्माण झाली 
 
येऊर गावामध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून भव्य बंगल्यांची उभारणी केली गेली आहे. 2009 मध्ये जेमतेम 134 बंगले असलेल्या या भागात 2020 पर्यंत 500हून अधिक बांधकामे उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात नव्या बांधकामांची गती अधिक वेगाने वाढून स्पोर्ट्स क्लब, टर्फ क्लब, रेस्टॉरन्ट, रिसॉर्ट आणि हॉटेलांची संख्या कमालीची वाढली आहे. या सर्व बांधकामांना पाणी कुठून मिळते, त्यासाठी इतक्या प्रमाणात बोअरवेल खणल्या जातात का, तसे असेल, तर त्यासाठी वन विभाग किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली जाते का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 


येऊर भागातून पाणी पट्टीचा एकही रुपया पालिकेला मिळत नाही


येऊर वनक्षेत्राच्या हद्दीत भारतीय हवाई दलाची वसाहत असून या वसाहतीसाठी विशेष पाण्याची टाकी देण्यात आली आहे. हवाई दलाशी झालेल्या करारानुसार त्यांना मोबदल्यासह पाणीपुरवठा केला जातो. येऊर हा आदिवासी भाग असल्याने करारानुसार  प्रत्येक पाड्यामध्ये एका मोफत सार्वजनिक नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या माध्यमातून येणाऱ्या पाण्यावर अनधिकृतपणे येथील अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या बांधकामांकडून डल्ला मारला जात आहे. जी पाईप लाईन आदिवासींसाठी आहे त्या पाईप लाईन ला अनधिकृतपणे नळ जोडणी करून पाणी चोरले जात आहे. येऊर भागातून पाणी पट्टीचा एकही रुपया पालिकेला मिळत नाही, म्हणजेच हे सर्व हॉटेल बंगले मालक फुकट पाणी वापरतात, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महासभेत झाली होती, मात्र परिस्थिती जैसे थे आहे.


आश्चर्य म्हणजे बंगले रिसॉर्टना महापालिका पाणी पुरवत नाही, एवढेच पाणी विभागाचे अधिकारी सांगू शकतात. मात्र मग तेथे पाणी येथे कुठून, याचे काहीही स्पष्टीकरण त्यांच्याकडे नाही. या विभागात बोअरवेलसाठी परवानगी दिली होती का, याचा तपशीलही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नाही. याहून चीड आणणारी गोष्ट म्हणजे हे सर्व बंगले रिसॉर्ट ठाण्याच्या सत्ताधाऱ्यांचे आहेत. मग पार्टी करायला आल्यावर त्यांना आदिवासी बांधवांचे दुःख कळत नाही का हा खरा प्रश्न आहे.