मुंबई :  महाराष्ट्राच्या बहुतांश (Maharashtra Rain)  भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि रायगड (Mumbai Rain Update)  या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.  ठाणे, कल्याण, डोंबिवली उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाने  मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट दिला आहे.  मुंबईभोवती पाणीच पाणी साचले आहे. मिठी, उल्हास नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.


भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने, मुंबई महानगराला उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. 
कल्याण स्टेशनजवळ असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कपोते वाहन तळासमोर गुडघाभर पाणी साचलंय.  अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं योगी धाममध्ये लाखो रुपये खर्च करून सिटी पार्क उभारण्यात आलाय. या पार्कच्या बाजूलाच वालधुनी नदी आहे . गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिटी पार्क जलमय झालाय. 


मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर परिणाम


मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर परिणाम, मध्य रेल्वे 20 ते 25, हार्बर 15 ते 20 तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिराने सुरू आहे.  मुंबईत सर्व मार्गावरील लोकल सुरू मात्र उशिराने सुरू आहे.  मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने  तर धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिराने सुरू आहे.  हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने आहेत. तसेच पश्चिम रेल्वेच्या लोकल 10 मिनिटे उशिराने धावत आहेत जोरदार पाऊस असल्याने गाड्यांचा वेग मंदावला असून कर्जत कसारा इथून येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस जास्त उशिराने आहेत. 


अंधेरी सबवे पाण्याखाली 


मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे जलमय  सबवे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद  करण्यात आला आहे.   पश्चिम उपनगरात मागील एक तासापासून सुरू असलेला मुसळाधार पावसामुळे अंधेरी सबवे पाणी खाली गेला आहे.  अंधेरी सबवे खाली सहा ते सात फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 


पालधरमध्ये शाळांना सुट्ट्या


पालघर जिल्ह्यातील दुपारच्या सञातील सर्व शाळांना पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सध्या भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सकाळी भरलेल्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन, तात्काळ घरी सोडण्यात याव्यात, तर दुपारच्या सञात भरणा-या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी घेतला आहे. 


ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात


 सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ठाण्यात पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असून हवेत गारवाही निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यात पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. कळवा, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, शहापूर या भागात परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. बुधवारीही येथे पावसाची रिमझिस सुरु होती. दरम्यान, आज वातावरणात बदल झाला असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.


उल्हास नदी दुथडी भरून 


मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव जवळील पुलाखालून वाहणारी उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. कल्याण अहमदनगर रस्त्यावर उल्हास नदी पात्रातील पाणी रस्त्यावर बाजुला असलेल्या नाल्याचा आणि नदीचा संगम झाल्याने कल्याण अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे  रस्त्यावरील कमरेएवढे पाणी साचले आहे या पाण्यातून चार चाकी वाहन दोन चाकी वाहन आपला जीव धोक्यात घालून रस्ता पार करत आहेत.


नालासोपारा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस


वसई-विरार नालासोपारा परिसरात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसंच परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे  त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 


नागोठणे परिसरात मुसळधार पावसाने पूर परिस्थिती


नागोठणे शहरातील आंबा नदीने देखील आता धोक्याची पातळी ओलांडलीय. दरम्यान या परिसरातील संपूर्ण भात शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकरी राजा देखील संकटात सापडलाय.. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी देखील पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय..नागोठणे शहरांमधील आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण आंबा नदीचे पाणी पसरलं जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आहे.  


मिठी नदीच्या पातळीत वाढ


मिठी नदी धोकादायक पातळीजवळ वाहत आहे.  कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागातील वासहतींना सतर्कतेचा इशारा दिली असून सध्या नदीची पातळी 2.6  मीटरवर वाहत आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी माईक घोषणा देऊन इशारा  दिला आहे.  


हे ही वाचा :


पुण्यात पावसाचे चार बळी; अंडा भुर्जीच्या स्टॉलवरील तिघांना शॉक, तर भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू