मुंबई : मनपा अधिकारी कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतरही ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी अजून काही थांबलेली नाही. ठाणे महापालिकेच्या पथकावर एका नारळविक्रेत्यानं चाकू उगारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यावेळी आधी बोट कापलं, आता शीर कापू असं म्हणत या फेरीवाल्यानं मनपा पथकाला धमकावलं आहे.
विशेष म्हणजे पातलीपाडा येथील पालिका आयुक्तांच्या निवास्थानाजवळील असलेल्या परिसरात हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. या कारवाईच्या दरम्यान कडधान्य विकणाऱ्या एका फेरीवाल्याने आधी बोटे छाटली होती, आता सरळ गळा कापेन अशी उघड धमकी देत हातातील चाकू उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकामध्ये असलेले चार कामगार या फेरीवाल्यावर धावून घेल्याने त्याने चाकू खाली ठेवला. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही आणि पिंपळे यांच्यावरील हल्ल्यांची पुनरावृत्ती टळली.
या फेरीवाल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणी पोलिसात गुन्ह दाखल करण्यासाठी प्रशासनाने दिरंगाई केल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. मात्र पुन्हा झालेल्या या प्रकारामुळे मागच्या प्रकरणातून पालिकेने काही धडा घेतला नसल्याचे उघड झाले आहे. अनाधिकृत फेरीवाल्यांचा विषय अजूनही तसाच असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला
ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलाय. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले होते.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.